बेळगावच्या राजकारणातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या डीसीसी बँकेच्या निवडणुकांमधील १३ जणांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित ३ जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील आणि काँग्रेसच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्यात जोरदार लढत होत आहे.
उर्वरित ३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत खानापूर मतदार संघ हा प्रतिष्ठेचा मानला जातो. अरविंद पाटील आणि अंजली निंबाळकर यांनी आपापल्या समर्थकांना महाराष्ट्रातील रिसॉर्टमध्ये ठेवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि भालचंद्र जारकीहोळी यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न केले. दरम्यान १६ पैकी १३ जागांसाठी बिनविरोध उमेदवार निवडीची प्रक्रियाही त्यांनी पार पाडली.उर्वरित ३ जागांच्या लढतीसाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी प्रयत्न केले परंतु दोन्ही आमदारांनी यासाठी परवानगी दिली नाही. दरम्यान खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी आमदारांना पाठिंबा दर्शविला आहे. परंतु या निवडणुकीत आपला विजय होण्याचा ठाम विश्वास अंजलीताई निंबाळकर यांनी बोलून दाखविला आहे.
दरम्यान या निवडणुकीसाठी आमदार अंजलीताई निंबाळकरांचे समर्थक मतदार महाराष्ट्रातील एका रिसॉर्टमध्ये दडले आहेत. तर माजी आमदार अरविंद पाटील यांचे समर्थक मतदार हे महाराष्ट्रातीलच रिसॉर्टमध्ये ठाण मांडून बसले आहेत, अशी शक्यता आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांच्या मतदारांचा मोर्चा सध्या महाराष्ट्रातील सावंतवाडी येथील मालवण समुद्रकिनारी आहे तर आमदार अंजलीताई निंबाळकर यांचे मतदार पुण्यातील अँबीवॅली येथे गुप्तपणे रहात असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.
डीसीसी बँकेच्या या तीन जागांसाठी होणाऱ्या रंगतदार लढतीत कोण बाजी मारेल? दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सुरु असलेली रस्सीखेच कोणाच्या बाजूने निकालात येईल? हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.