सर्व सरकारी कार्यालये, शाळा, रस्ते, उद्याने यांचे फलक, सरकारकडून आकारण्यात येणारी दंडाची पावती आणि अंगणवाडीतील शिक्षण कन्नडमध्ये देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजाविला आहे. एकप्रकारे बेळगाव जिल्हा प्रशासनाने कानडीकरणाचा फतवा काढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कन्नड अंमलबजावणी आणि विकास आढावा पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका, पोलीस व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना कन्नडबाबत विविध सूचना केल्या आहेत. या एकंदर परिस्थितीवरून मराठी प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बजाविलेल्या आदेशानुसार सर्व सरकारी कार्यालयाने आणि शाळांमध्ये ज्ञानपीठ विजेत्यांच्या प्रतिमा लावले आणि दुकानांसमोर कन्नड भाषेत फलक लावणे बंधनकार आहे. या आदेशाचे पालन ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कन्नड भाषेचा वापर वाढला पाहिजे, यासाठी सरकारी पातळीवरील सर्व कामे कन्नडमधूनच करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले. शहरातील दुकानांवर कन्नडमध्ये फलक लावावेत, आणि ज्या दुकानदारांनी कन्नडमध्ये फलक लावले नाहीत, त्यांना नोटीस बजाविण्यात यावी, मराठी शाळांमधून कन्नड शिक्षकांची कमतरता असू नये, अशा ठिकाणी तात्काळ कन्नड शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
घरातील म्हणजेच मातृभाषा मराठी असली तरी चालेल, पण अंगणवाडीमध्ये कन्नडमध्येच शिक्षण देण्यात यावे. शहरातील नव्या उद्यानांच्या फलकांवर कन्नडमध्ये फलक लावण्यात यावेत, अशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
त्याचप्रमाणे परवाना घेण्यासाठी कन्नड बंधनकारक असेल, परवाना नूतनीकरण करताना फलक कन्नड भाषेत असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच उद्यानात सूचनाफलक कन्नडमध्ये लावावेत, अशा सूचना दिल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली.