संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची चर्चा सुरु असतानाच बेळगाव जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांच्या बाबतीत दिलासादायक वृत्त समोर आले आहे. आज जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६८ वर येऊन स्थिरावली आहे. कोविडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३०० च्या आत आल्यामुळे जिल्ह्यात समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.
अजूनही कोरोनाचा धोका टळला नसून मेट्रो सिटीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु बेळगावमधील कोरोना परिस्थिती समाधानकाराकरित्या वाटचाल करत आहे.
बुधवारी राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार २४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात दिवसेंदिवस शेकडोंच्या संख्येने रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत होते. परंतु हळूहळू कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे.
आज जिल्ह्यातून ५६ जणांना उपचाराअंती डिस्चार्जही देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण २४९१५ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून एकूण ३४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच अजूनही २०६२ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आजपर्यंत एकूण चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या हि २७३३७७ इतकी असून आज बेळगाव मधील ११, गोकाक मधील ३, बैलहोंगल मधील १, अथणी मधील २, हुक्केरी मधील २, खानापूर मधील २ , रायबाग मधील ३ अशा एकूण २४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांच्या घटत्या संख्येमुळे बेळगाव जिल्हा रुग्णालयात आजपासून कोरोनाबाह्य रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष पूर्ववत सुरु करण्यात आले आहेत. कोरोनाचा धोका अजूनही टळला नसून बाजारात लस उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहान आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.