हे छायाचित्र आहे शहरातील कोर्ट आवारासमोरील रस्त्यावर आज सोमवारी दुपारी झालेल्या वाहतुकीच्या कोंडीचे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची विकास कामे आणि शहरांतर्गत वाहतुकीत झालेली वाढ यामुळे नागरिकांना सध्या ठीकठिकाणी वरीलप्रमाणे वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लि.कडून कोर्ट आवारासमोरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दुपदरी असलेल्या या मार्गावर सध्या एका बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे.
परिणामी आज दुपारी दीड ते दोनच्या सुमारास परस्पर विरुद्ध दिशेकडून येणारी वाहने एकमेकांसमोर आल्याने याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या. अखेर वाहतूक पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या “ट्रॅफीक जॅम”मध्ये अडकून पडल्यामुळे तातडीच्या कामासाठी निघालेल्या वाहनचालकांना मात्र बराच मनस्ताप सहन करावा लागला.