रामदुर्ग तालुक्यातील जगज्योती बसवेश्वरांच्या मूर्तीबाबत वाद विकोपाला जाण्याआधी सत्य उघडकीस आले आहे. काही समाजकंटकांनी या मूर्तीला भग्न करायचा प्रयत्न केला असे भासून पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा शोध घेण्याआधी या प्रकारामागचे सत्य स्वतः स्थानिकांनीच उघड केले असून या मूर्तीबाबत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून आकस्मिकपणे हि बाब घडल्याचे निदर्शनास आले आहे.
श्री बसवेश्वर यांच्या मूर्तीला इजा पोहोचली असल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. यासंबंधी काही स्थानिकांनी कटकोळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात सामील असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु या मूर्तीबाबत कोणताही अनुचित प्रकार घडले नसल्याचे त्वरित समजले असून हि तक्रार मागे घेण्यात आली आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी कि, गावातीलच काही शेतकरी मध्यरात्री शेतात पाणी सोडण्यासाठी जात होते. दरम्यान बसवेश्वरांच्या मूर्तीवरील शाल खाली पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी हि शाल यातील काही जणांनी पूर्ववत करण्यासाठी मूर्तीकडे धाव घेतली.
हि शाल नीट करत असताना श्री बसवेश्वर मूर्तीचा हात तडा जाऊन थोडासा खाली आला. हि बाब कोठेही उघडकीस येऊ नये, यासाठी भीतीपोटी याच लोकांकडून हि बाब लपवण्यात आली. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हा वाद विकोपाला जाऊन पुन्हा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावातील मान्यवर नागरिकांना घडला प्रकार सांगण्यात आला.
हा सारा प्रकार लक्षात येताच तातडीने पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकाऱ्यानी लक्ष घातले आहे.