मागील वर्षी ऐन लग्नाच्या हंगामात कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ झाल्यामुळे लग्न समारंभावरील मर्यादेसह बँड वादनावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ही बंदी उठवण्यात आली असून जिल्हाधिकारी तसेच सरकारने लग्नामध्ये बँड वाजविण्यास परवानगी दिली आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सुमारे 350 बँड कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यामुळे लग्न समारंभातील उपस्थितांच्या मर्यादेसह बँड वादनावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बँडमधील वाजप्यांसह मालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली.
कोरोना प्रादुर्भावामुळे बँड व्यावसायिकांवर जनु संकटच कोसळले होते. बेळगांव जिल्ह्यामध्ये जवळपास 350 बँड कंपनी आहेत. एका कंपनीमध्ये 20 ते 25 माणसे काम करतात.
बँडवर बंदी घालण्यात आल्यामुळे यापैकी बहुतांश लोकांसह त्यांच्या कुटुंबांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेंव्हा या वर्षीच्या हंगामात तरी आम्हाला बँड वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगांव जिल्हा मंगलवाद्य आणि बँड व्यावसायिकांच्या संघटनेने सरकारकडे केली होती.
या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी तसेच सरकारने यंदाच्या लग्नाच्या हंगामात मंगलवाद्य आणि बँड वादनास परवानगी दिली आहे. याबद्दल संघटनेचे अध्यक्ष परशुराम यल्लाप्पा वाजंत्री, उपाध्यक्ष बसवराज बंजत्री, संतोष महादेव बंजत्री, वासिम दस्तगीरसाब बसरीकट्टी, हनुमंत बंजत्री, कल्लाप्पा कोरवर, अशोक कुडची यांच्यासह इतर बँड चालकांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे आभार मानले आहेत.