हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील सुवर्णसौधसमोर अनेक छोट्या मोठया आंदोलनांची चलती सातत्याने सुरु असते. कोणत्याही क्षुल्लक कारणासाठीदेखील सुवर्णसौध आंदोलनकर्त्यांकडून लक्ष्य केले जात आहे. परंतु यापुढील काळात अशा आंदोलनांवर पोलीस खात्याने बंदी घालण्यात आली आहे. सुवर्णसौधच्या ५०० मीटर अंतरापर्यंत कोणतेही आंदोलन करण्यास निर्बंध घालण्यात आले असून यासंबंधीचा आदेश शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी जारी केला आहे.
२४ नोव्हेंबर रोजी ७ वाजल्यापासून २४ जानेवारी २०२१ रोजी मध्यरात्रीपर्यंत सीआरपीसी १९७३ च्या कलम १४४ अंतर्गत असलेल्या नियम आणि अटीप्रमाणे सुवर्णसौधच्या ५०० मीटर अंतरापर्यंत गर्दी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची जीवाला हानी पोहोचेल अशी वस्तू बाळगण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
आंदोलनकर्त्यांकडून नागरिकांना त्रास देण्याचे सत्र सुरु असून आंदोलनकर्त्यांच्या होत असलेल्या गर्दीमुळे आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा उपाय शोधण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांकडून गर्दी करण्यात येऊन राष्ट्रीय महामार्गावर रहदारीला अडथळा निर्माण करण्यात येतो. त्याचप्रमाणे रास्त रोको करण्यात येऊन अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करण्यात येतो.
या मार्गावरून येणाऱ्या रुग्णवाहिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. यावर उपाय म्हणून पुढील काळात अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येणाऱ्यांवर अटकेची कारवाई कण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अंत्ययात्रा किंवा लग्नसमारंभाच्या मिरवणुकीसाठी या सूचना वगळण्यात आल्या असून सुवर्णसौध परिसरात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.