नेहमीच प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर बोट करणं योग्य नाही. समाजात वावरताना आपलीही कर्तव्ये ओळखून नागरिकांनी राहिले पाहिजे. अनेक ठिकाणी प्रशासनाचा बेजबाबदारपणा नक्कीच दिसून येतो. परंतु समाजातील अनेक महाभाग असेही आहेत ज्यांना समाजातील कोणत्याही गोष्टीची पर्वा नसते.
संपूर्ण शहर, उपनगर आणि काही ग्रामीण भागातही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने सोय करून दिली आहे. परंतु आपल्याला वाट्टेल तिथे कचरा भिरकवण्याची काही नागरिकांची सवय जैसे थेच आहे.
कचरा गाडी व्यतिरिक्त अनेक ठिकाणी कचरा कुंडांची सोय करण्यात आली आहे. परंतु अनेक बेशिस्त नागरिकांना उघड्यावर कचरा टाकण्यातच धन्यता मिळते. भाग्यनगर चौथा क्रॉस येथे कचरा न टाकण्यासंबंधी विविध भाषांमध्ये एक फलक लावण्यात आला आहे.
परंतु याचे कसलेच भान न जपता पुन्हा याठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. याठिकाणी जवळच सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. आणि या कॅमेऱ्यात कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकाची छबी कैद झाली आहे.
अशा बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाने जागरूकता दाखवून आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्याआधी जागरूक नागरिकांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत करणे गरजेचे आहे.