सहलीसाठी गेलेल्या आणि त्यानंतर हालात्री नाल्यामध्ये बुडून बेपत्ता झालेल्या खानापूर शहरातील दोन मुलांचे मृतदेह असोगा येथे हे सापडले आहेत.
उमेर मुस्ताक खलिफा (रा. बाहेर गल्ली, खानापूर) आणि अरफात शहाखलिद अरकोटी (रा. रविवार पेठ, खानापूर) अशी मयत मुलांची नांवे आहेत. हे दोघेही जिवलग मित्र होते. स्वामी विवेकानंद शाळेमधून यंदा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले हे दोघे आणखी एका मित्रासोबत गेल्या शनिवारी दुचाकीवरून सहलीला गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी खानापूर हे खानापूर -हेमाडगा रस्त्यावर बंद पडली. त्यावेळी उमेर व अरफात त्याच ठिकाणी थांबले व त्यांचा तिसरा मित्र गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पुन्हा खानापूरला आला.
गाडीत पेट्रोल भरुन तो पुन्हा उमेर आणि अरफात यांना घेण्यासाठी आला. त्यावेळी ते दोघे जागेवर नसल्यामुळे त्याने त्या दोघांचा बराच शोध घेतला.
अखेर दोघांचाही काहीच पत्ता न लागल्यामुळे खानापूरला येऊन त्याने त्यांच्या घरी माहिती दिली. रात्रभर शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी उमेर व अरफात या दोघांचेही कपडे, मोबाईल व चप्पल खानापूरनजीक असलेल्या हालत्री नाल्याच्या काठावर आढळले.
याबाबत पोलिसात माहिती देण्यात येताच खानापूर पोलीसांनी अग्निशामक दलाच्या सहाय्याने शोध मोहीम हाती घेतली. तेंव्हा आज सोमवारी दोन्ही मुलांचे मृतदेह असोगा येथील मलप्रभा नदीच्या पात्रात आढळून आले. सदर घटनेची खानापूर पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.