Saturday, December 28, 2024

/

जनतेच्या इशाऱ्यावर काम सुरु पण रास्ता रोको होणारच!

 belgaum

एपीएमसी रस्त्याच्या अर्धवट कामाबाबत जनता आक्रमक झाली असून ११ नोव्हेंबर रोजी रास्ता रोकोची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. परंतु उद्या होणार रास्ता रोको कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी दिली आहे.

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ याप्रमाणे कोणत्याही पद्धतीचा इशारा दिला कि तातडीने दुसऱ्या दिवशी रस्त्याचे काम हाती घेण्यात येते. परंतु २ दिवस काम करण्याचे नाटक करून पुन्हा हे काम थांबविण्यात येते. मागील १ वर्षांपासून या रस्त्याचे काम अशाच पद्धतीने होत आहे. त्यामुळे आता रस्ता पूर्ण झालाच पाहिजे, यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी देण्यात आलेली रास्ता रोकोची हि हाक कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नसून हा रास्ता रोको होणारच असा निर्धार त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केला आहे.

या रस्त्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा संबंधित प्रशासकीय कार्यालयातून निवेदने दिली आहेत. परंतु हा रस्ता अजून जैसे थेच आहे. एपीएमसी ते कंग्राळी खुर्दच्या रस्त्याचे कामकाज हाती घेऊन महिने उलटून गेले. परंतु अजूनही या रस्त्यांचे काम अर्धवट स्थितीत आहे. या रस्त्याचे कामकाज त्वरित पूर्ण करण्यात यावे, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा कंग्राळी खुर्द आणि श्री मार्कंडेय व्यायाम मंदीर कंग्राळी खुर्द यांच्यावतीने नागरिकांच्या सहयोगातून रास्त रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या बुधवारी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एपीएमसी समोर रास्ता रोको करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या रस्त्याच्या अर्धवट स्थितीतील कामकाजामुळे अनेक अडचणींचा सामना या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे. संपूर्ण पावसाळा उलटून गेला, चिखलाचे साम्राज्य पसरले, अनेक अपघात झाले, वाहनधारकांना तर दररोज या रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे. परंतु प्रशासनाने मात्र याकडे डोळेझाक केली आहे.

मागील वेळेस ग्रामीण आमदारांनी या रस्त्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. परंतु दोन दिवस काम करणे आणि पुन्हा हे काम थांबविणे असाच प्रकार सातत्याने गेले १ वर्षभर सुरु आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, आणि जनतेच्या अडचणी सोडवून संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याचे कामकाज हाती घ्यावे यासाठी हा रास्त रोको करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कंग्राळी खुर्द शाखेचे कार्याध्यक्ष आर. आय. पाटील यांनी दिली असून या रास्तारोकोमध्ये स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.