शहरातील कचऱ्याची उचल दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचप्रमाणे रात्री रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्यांना शोधून दंडात्मक कारवाई करण्यासाठी 4 पथके स्थापन करण्यात आली आहेत.
सध्या शहरात सकाळच्या सत्रामध्ये कचरा गोळा करून त्याची वाहतूक केली जाते. परंतु त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जातो. या पद्धतीने विशेष करून शहरात रात्रीच्या वेळी रस्त्याकडेला कचरा टाकण्याचा जो प्रकार होत असतो त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेने चार पथके स्थापन केली आहेत. या पथकांचे काम सुकर करण्यासाठी रात्रीच्या वेळी ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो अशी ठिकाणी महापालिकेने शोधली आहेत. त्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात केले जातील. दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत हे कर्मचारी त्या ठिकाणी थांबतील. वॉकी-टॉकी घेऊन सुसज्ज असलेले हे कर्मचारी कचरा टाकणारे सापडताच त्यांची माहिती वरिष्ठांना देतील. माहिती मिळताच वरिष्ठ तात्काळ संबंधित ठिकाणी पोहोचून कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करतील.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता महांतेश नरसन्नावर व आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी नुकत्याच घेतलेल्या आरोग्य कर्मचारी व सफाई ठेकेदारांच्या बैठकीमध्ये उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.