तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तसेच विक्री करण्यावर बंदी असूनही अनेक दुकानांमधून राजरोसपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द करणायचा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला. गुरुवार दि. २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित COTPA (सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन कायदा) त्रैमासिक सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
जिल्ह्यातील सर्व शाळा – महाविद्यालयाच्या आवारात १०० मीटर व्याप्तीच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी सक्त मनाई असून, बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शिक्षकांसहित सव्र्ह सरकारी कर्मचाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री थांबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. COTPA कायद्यांतर्गत अधिकाधिक तक्रारी दाखल करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या नेतृत्वाखाली तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ठिकाणी धाड घालावी, आणि पोलीस खात्याच्या सहकार्याने आवश्यक ती पाऊले उचलावीत, सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांवर COTPA कायद्याच्या कलाम ४ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास निषेध असून कलाम ५ अन्वये सिगरेट आणि तंबाखू उत्पादनाच्या जाहिरातींवरही निषेध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कलम ६ (अ) अन्वये अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यासही बंदी असून विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रत्येक तालुक्यात अशाचपद्धतीने कठोर पावले उचलावीत, बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी पाऊले उचलून वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसस्थानकांवर जागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
या बैठकीला पालिका आयुक्त जगदीश, गुन्हे आणि वाहतूक विभागाचे उपपोलीस आयुक्त चंद्रशेखर नीलगार, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.