Thursday, December 26, 2024

/

इनलाईन स्केटिंगमध्ये अभिषेक नवले याचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड!

 belgaum

बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या अभिषेक नवले याने 100 मी. इनलाईन स्केटिंमध्ये 12.85 सेकंद इतकी सर्वात जलद वेळ नोंदवत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याबरोबरच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नांवाची नोंद केली आहे.

एनडब्ल्यूकेएसआरटीसी रोड, गणेश सर्कल रामतीर्थनगर, बेळगांव येथे हे आज बुधवारी सकाळी 8 वाजता अभिषेक नवले याने उपरोक्त विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी 100 मी. इनलाईन स्केटिंगमध्ये सर्वात जलद वेळ नोंदविण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन मुलाच्या नांवावर होता. त्याने 100 मी. इनलाईन स्केटिंग 13.24 सेकंदात पूर्ण केले होते. हा विक्रम आज अभिषेकने मोडीत काढून 12.85 सेकंदाचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

या पद्धतीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारा अभिषेक नवले हा शिवबसवनगर येथील शेख कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये पदवीपूर्व द्वितीय वर्षात शिकत आहे. त्याचे वडील संजय नवले हे वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या (एनडब्ल्यूकेआरटीसी) बेळगांव चौथ्या डेपोमध्ये बस चालक वजा वाहक म्हणून सेवा बजावत आहेत. अभिषेक ला त्याचे वडील आणि गृहिणी असलेली आई सुजाता यांचे सतत प्रोत्साहन लाभत असते.

गेल्या 14 वर्षापासून अभिषेक नवले स्केटिंगचा सराव करत असून त्याने पोर्तुगाल येथे झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धेसारख्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत. अभिषेकने स्केटिंगमध्ये तीन वेळा जागतिक विक्रम नोंदविला असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दोन वेळा त्याच्या स्केटिंग कौशल्याची नोंद घेतली आहे. गेल्या 2014 मध्ये त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्याचे नाव सुचविण्यात आले आहे. अभिषेक नवले याला बेळगांव रोलर स्केटिंग अकॅडमीचे उमेश कलघटगी यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल अभिषेक नवले यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.