सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या गरजांचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज कोविड उपचारामध्ये सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली लूट आणि खासगी रुग्णालयाचा मनमानी कारभार हा मुद्दा उचलून धरत जिल्हा पंचायत स्थायी समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी एस. व्ही. मुन्याळ यांना धारेवर धरले. आज सकाळीच या मुद्द्यावर ग्रामीण भागातील नागरिकांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या मुद्द्यावर लक्ष वेधले होते.
जिल्हा पंचायत स्थायी समितीच्या सामान्य न्याय समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर हि पहिलीच बैठक होती. या बैठकीत हा महत्वाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. माजी आमदार बी. आय. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. या दरम्यान त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
सुरुवातीला त्यांना कोविड पॉझिटिव्ह म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर कोविड रुग्ण म्हणून उपचार करण्यात आले. परंतु त्यानंतर त्यांचे अहवाल कोविड निगेटिव्ह आले. यादरम्यान त्यांचे उपचाराचे बिल लाखांच्या घरात होते. खाजगी रुग्णालयाद्वारे अशाच पद्धतीने सर्वच रुग्णांकडून पैसे उकलण्याचा खेळ सुरु असून सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.
जर अशा मोठ्या नेत्यांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची किती हेळसांड होत असेल? याची पडताळणी करणे गरजेचे आहे. शिवाय खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्स बंद करून जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढवावी, कोविड उपचाराचा दर्जा वाढवून जिल्हा रुग्णालयात सर्व सेवा योग्य रीतीने पुरवाव्यात, शिवाय खासगी रुग्णालयातून होत असलेल्या या मनमानी कारभारावर वचक बसावा यासाठी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली.
खासगी रुग्णालयांकडे अशा पद्धतीने पैसे उकळण्यासाठी कोणताही अधिकार नाही. केवळ कोविड वरील उपचारच नाही तर इतर सर्वसामान्य आजारांसाठीही अशाचपद्धतीने पैसे उकळण्यात येत आहेत. कधी पीपीई किटच्या नावावर तर कधी अतिरिक्त परिचारिका शुल्कच्या नावावर, तर कधी स्पेशल वॉर्डच्या नावावर पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय या बिलाव्यतिरिक्त औषधांचाही भरमसाट खर्च सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. अशा पद्धतीने पैसे उकळणे हा गुन्हा ठरू शकतो त्यामुळे हा प्रकार थांबवून खासगी रुग्णालयाच्या अशा प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोविड काळात ज्या रुग्णांच्या उपचाराची बिले २ लाखाहून अधिक आली आहेत त्यातील २ लाखांच्या वरची रक्कम रुग्णांना परत देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे, आणि खासगी रुग्णालयाचा मनमानी कारभार थांबविण्यासाठी आवाज उठविला पाहिजे, अशा रुग्णालयावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी असल्याचेही जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी सांगितले आहे.