काल रात्री बेळगावच्या गॅंगवाडी परिसरात खून झाला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल मध्यरात्री बेळगावमध्ये शहाबाज पठाण उर्फ शहाबाज रावडी वय 24 रा.आझमनगर याचा खून झाला असून किरकोळ वादातुन हा खून झाला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या मुत्यानट्टी गावातील दोन युवकांना माळ मारुती पोलिसांनी अटक केली आहे.
बसवानी सिद्धप्पा नाईक वय 27,बसवराज होल्याप्पा दद्दी वय 26 दोघेही रहाणार मुत्त्यानट्टी याना अटक करण्यात आली आहे.
एका किरकोळ वादाची सांगता ही खुनाने झाली असून या घटनेने गॅंगवाडी परिसर हादरला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मुत्यानट्टी या गावातील युवक बाईक वरून जात असताना शहाबाज रावडी याला धक्का लागला. आणि यानंतर या दोघांमध्ये वाद सुरु झाला. यादरम्यान शहाबाज रावडी याने प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून मुत्यानट्टी येथील युवकाने पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. त्यानंतर त्या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि शहाबाज याला पोलीस कोठडीत रहावे लागले. प्राणघातक हल्ला झालेल्या मुत्यानट्टीच्या युवकाच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तसेच शहाबाज यालाही जामीन मिळाला. यादरम्यान द्वेष उफाळून आलेल्या दोघांमध्येही पुन्हा काकती येथे वाद झाला. ही तक्रार काकती पोलिसात दाखल करण्यात आल्यामुळे शहाबाजच्या बाजूचे युवक आणि मुत्यानट्टी गावातील युवकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा वाद मिटला नाही.
काल रात्री शहाबाज रावडी पार्टीसाठी गेला होता. ही माहिती मिळाल्यानंतर कट रचून शेख होमियोपथी मेडिकल कॉलेज जवळ त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यादरम्यान बाईकवर असलेल्या शहनाजने आपली बाईक तिथेच सोडून धावत – पळत त्याने निवृत्त डीवायएसपी प्रकाश यांच्या घराकडे धाव घेतली. परंतु दुसऱ्या गटाने त्यांच्यावर हल्ला करणे थांबविले नाही आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
एका किरकोळ वादातून सुरु झालेल्या या भांडणाचा शेवट इतक्या मोठ्या खुनात बदलेल, याची कल्पनाच कुणी करू शकणार नाही. बेळगावमध्ये अजूनही गॅंगवॉर सारखे प्रकार सुरु असून बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्याचे कार्य अशा गँगच्या माध्यमातून होत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच सावध होऊन अशा घटना होण्यापासून थांबवावे, आणि यामागे कार्यरत असणाऱ्या टोळींना जेरबंद करून बेळगावची शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्याची गरज आहे.