अशोकनगर येथील कॅन्सर हॉस्पिटल नजीकच्या फलोत्पादन खात्याच्या व्यवसायिक दुकान गाळ्यांपैकी 13 दुकान गाळे आपल्याला भाडेपट्टीवर वापरण्यास देण्यात यावेत, अशी मागणी बेळगांव होलसेल फ्लॉवर मर्चंट असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगाव होलसेल फ्लॉवर मर्चंट असोसिएशनतर्फे हे अध्यक्ष शंकर गौडर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यक आणि निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बेळगांव होलसेल फ्लॉवर मर्चंट असोसिएशनचे सदस्य गेल्या 25 वर्षापासून न्यू गांधीनगर नजीकच्या आरएस 1119/3 या जागेत आपला फुलांचा ठोक व्यवसाय करत आहेत. जिल्हा पंचायतीच्या फलोत्पादन खात्याने अशोकनगर येथील कॅन्सर हॉस्पिटल नजीक नवे व्यवसायिक दुकान गाळे बांधले आहेत. गांधीनगर येथील जागेत आमची बरीच गैरसोय होत आहे. तेंव्हा फलोत्पादन खात्याच्या नव्या दुकान गाळ्यांपैकी 13 गाळे आम्हा 13 होलसेल फुल विक्रेत्यांना भाडेतत्वावर देण्यात यावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.निवेदन भाजप नेते शंकर गौडा पाटील आणि जिल्हा पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी यांना देखील देण्यात आले आहे.
फलोत्पादन खात्यातर्फे अशोक नगर येथील कॅन्सर हॉस्पिटल नजीक असणाऱ्या व्यापारी दुकान गाळ्यांचा लिलाव येत्या 23 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. तेंव्हा गेल्या 25 वर्षापासून आम्ही फुलांच्या विक्रीचा व्यवसाय करत आहोत हे ध्यानात घेऊन सर्वप्रथम आम्हा 13 जणांना संबंधित दुकान गाळे भाडेतत्वावर देण्यात यावेत अशी आमची मागणी आहे असे संघटनेचे उपाध्यक्ष अल्ताफ अत्तार यांनी पत्रकारांना सांगितले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष शंकर गौडर यांच्यासह एस. बी. बंडी, फरीद अहमद, गौर बागवान, जलानी सौदागर, व्ही. एम. देशमुख, वाजिद शेख बद्रू मुल्ला, सलीम गाडीवाले आदी होलसेल फुलं विक्रेते उपस्थित होते.