आजकाल सर्व गोष्टींमध्ये भेसळ होत असल्याचे दिसून येत आहे. आता पेट्रोल देखील त्याला अपवाद नसल्याचे शहरातील एका पेट्रोल पंपवर घडलेल्या घटनेत स्पष्ट झाले आहे. या पेट्रोल पंपवरील पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात चक्क पाणी आढळून आल्यामुळे अनेक वाहनचालकांची वाहने नादुरुस्त होऊन त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
याबाबतची माहिती अशी की, शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील महांतेशनगर क्रॉस (फ्रुट मार्केट शेजारी) येथील एका पेट्रोल पंपवर आज दुपारी कांही दुचाकी वाहन चालकांनी पेट्रोल भरले. मात्र पेट्रोल भरून निघताच काही अंतरावर जाऊन त्यांची वाहने बंद पडू लागली.
चालकांनी आपली दुचाकी बंद का पडत आहे याची मेकॅनिककडे जाऊन शहानिशा केली असता गाडीत घालण्यात आलेल्या पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मिसळले असल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा संबंधित संतप्त वाहन चालकांनी तात्काळ त्या पेट्रोल पंपकडे धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तेंव्हा त्यांनी मॅनेजर आणि मालकाकडे बोट दाखविले वाहन चालकांनी जेंव्हा पेट्रोल पंप व्यवस्थापकाला धारेवर धरले.
तेंव्हा त्यांनी आपल्याकडून कांहीही चूक झाली नसल्याचे सांगून घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे पेट्रोल पंपवर बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर पेट्रोल पंपवर ज्यांनी -ज्यांनी पेट्रोल भरले त्यांच्या गाडीतील पेट्रोलमध्ये अर्ध्याहून अधिक पाणी मिसळलेले होते. परिणामी यापैकी बहुतांश वाहनचालकांच्या गाड्यांच्या इंजिनचे नुकसान झाले असून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित वाहन चालक उशिरापर्यंत “त्या” पेट्रोल पंपसमोर ठाण मांडून होते.
यासंदर्भात बेळगाव लाइव्हशी बोलताना अन्यायग्रस्त दुचाकी वाहन चालकाने बाटलीतून आणलेले पाणी मिश्रीत पेट्रोल दाखवून घडल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच आपली दुचाकी पूर्णपणे खराब झाल्याचे सांगून नव्या दुचाकीची मागणी केली.
https://www.instagram.com/p/CF4XSC7hZyd/?igshid=l0ftliy6fozc