घरपट्टीच्या नोटीसी मागोमाग बेळगांव कँटोन्मेंट बोर्डाने आता पाणीपट्टी भरण्याची सूचना नागरिकांना केली असून येत्या 31 ऑक्टोंबरपर्यंत पाणीपट्टी जमा न केल्यास नळजोडणी तोडण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील मालमत्ताधारकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी जमा केली नव्हती. घरपट्टी भरण्यासंदर्भात कॅंटोन्मेंट बोर्डाने गेल्या ऑगस्ट महिन्यात नोटीस बजावली होती.
या पाठोपाठ आता पाणीपट्टी भरण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डाने तगादा लावला आहे. ज्या नागरिकांनी अद्याप पाणीपट्टी जमा केले नाही त्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत पाणीपट्टी भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याची पूर्तता न झाल्यास नळ जोडणी बंद करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. परिणामी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रहिवाशांना पुढील 20 दिवसाच्या आत पाणीपट्टी भरावी लागणार आहे.