बेळगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी इंडोनेशियन नागरिकांना शिक्षा सुनावली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव १० इंडोनेशियन नागरिकांना २ दिवसाची न्यायालयीन कोठडी तसेच प्रत्येकी रुपये २०,००० इतका दंड ठोठावला आहे.
१० मार्च ते १३ मार्च दरम्यान हे इंडोनेशियन नागरिक नवी दिल्ली येथील तबलिघी जमात मरकझ मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर ते १६ मार्च दरम्यान थेट बेळगावला दाखल झाले होते. दरम्यान हे सर्व परदेशी नागरिक ऑटो नगर येथील मशिदीत रहात होते.
याठिकाणाहून ते इतरत्र कोठेही फिरले नसून, बेळगाव प्रशासनाने या १० जणांची ओळख पटवून यांना क्वारंटाईनही केले होते. परंतु पर्यटक व्हिसा असूनही त्या व्हिसाचे उल्लंघन करण्यात आले आहे.
यामुळे माळमारुती पोलिसांनी या १० परदेशी नागरिकांविरोधात एफआयआर दाखल केली होती. व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी या परदेशी नागरिकांना शिक्षा ठोठावली आहे.