शहरातील रस्त्यावरील विक्रेत्यांकडून भाडेपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या महसूल खात्याने टेंडर अर्थात निविदा काढली आहे. तथापि सहा महिने दुर्लक्ष करून आता लॉक डाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खराब झालेली असताना राबविल्या जाणाऱ्या भाडेपट्टी वसुलीच्या मोहिमेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
शहरातील रस्त्यावर भाजी विक्री फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनासह पावभाजी, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम विक्रेत्यांकडून भाडेपट्टी वसूल करण्याचा निर्णय महापालिकेच्या महसूल खात्याने घेतला आहे. यासाठी रस्त्यावर बसून भाजी अथवा फळ विक्री करणाऱ्यांना 10 रुपये, हातगाडीवर फळ विक्री करणाऱ्यांना 50 रुपये आणि हातगाडीवर पाणीपुरी आईस्क्रीम वगैरे विक्री करणाऱ्यांसाठी 100 रुपये असे भाडे ठरविण्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
या भाडे वसुलीसाठी सध्या निविदा काढण्यात आली आहे. भाडेपट्टी वसुलीची ही मोहीम खरेतर सहा महिन्यापूर्वीच राबविण्यात यावयास हवी होती. तथापि तसे न करता आता ही मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे रस्त्यावरील भाजी व फळ विक्रेत्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
कारण कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे या सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. हे विक्रेते सध्या जेमतेम उदरनिर्वाह पुरते पैसे कमवत आहेत. परिणामी महापालिकेची भाडेपट्टी भरणे त्यांना कठीण जाणार असल्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाडेपट्टीचा दर 5 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत ठेवण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान एकीकडे देशातील बेरोजगारांना 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करत असताना बेळगांव महानगरपालिका टेंडर अर्थात निविदेच्या नांवाखाली रस्त्यावरील गोरगरीब विक्रेत्यांकडून पैशाची लूट करत आहे, असा आरोप केला जात आहे. त्याचप्रमाणे भाडेपट्टी वसूली टेंडरच्या नांवाखाली स्वतःची तुंबडी भरून घेण्याचा कांही लोकांचा हा डाव असल्याचेही बोलले जात आहे.