बेळगांवच्या बेळगांव ट्रेकर्स ग्रुप या हौशी युवकांच्या समुहाने ट्रेकिंगद्वारे महाराष्ट्रातील पर्वतरांगांमधील सर्वोच्च मानले जाणारे कळसुबाई शिखर नुकतेच यशस्वीरित्या पादक्रांत केले.
कळसुबाई शिखर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक पर्वत शिखर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात असलेल्या या पर्वत शिखराची उंची 1,646 मीटर (5,400 फूट) असून हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यातील ही एक पर्वतरांग आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील उत्तुंग पर्वत शिखर असल्यामुळे ते पादक्रांत करणे ही एक मोठी साहसाची व अभिमानाची गोष्ट मानली जाते.
बेळगांवच्या बेळगांव ट्रेकर्स ग्रुपने हे शिखर पादाक्रांत करण्यासाठी गेल्या शनिवारी रात्री बेळगांवहून प्रयाण केले आणि रविवारी सकाळी 6 च्या सुमारास सर्वजण शिखरानजीक पोहोचले. नाश्ता वगैरे उरकून बेळगांव ट्रेकर्स ग्रुपच्या साहसी सदस्यांनी सकाळी 7 वाजता कळसुबाईचे शिखर चढण्यास सुरुवात केली आणि सर्वांनी अडीच तासात शिखर पादाक्रांत केले.
बेळगाव ट्रेकर्स ग्रुपने रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास कळसुबाई शिखरावर भगवा फडकवून आनंदोत्सव साजरा केला. शिखराची खडतर वाट पादाक्रांत करताना बेळगाव ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली असली तरी शिखर उतरण्यासाठी त्यांना फारसा वेळ लागला नाही.
कळसुबाई शिखर पादाक्रांत करणाऱ्या बेळगांव ट्रेकर्स ग्रुपमध्ये आकाश पावशे, राहूल कडेमनी, निखिल पाटील, सुहास काकेरु, ज्ञानेश्वर पाटील, विशाल सावंत, वृषभ मुचंडी, सुरज आपटेकर, शांताराम आलगोंडी, संदीप डुंबरे व
राम मनगुळी या साहसी युवकांचा समावेश होता. या युवकांनी त्यानंतर काल रविवारी नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर नजीकचे हरिहर गड (हर्षगड) यशस्वीरित्या पादक्रांत केला. बेळगाव ट्रेकर्स ग्रुपने यापूर्वी सज्जनगड, अजिंक्यगड, सावंतवाडी नजीकचा रांगणा किल्ला आदी ठिकाणी ट्रेकिंगच्या मोहिमा राबविल्या आहेत.