बेळगाव शहराची स्मार्ट सिटी मध्ये गणती झाल्यापासून शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनेक विकासकामे हाती घेण्यात आली. या विकासकामात त्रुटी अनेकवेळा प्रसारमाध्यमांवर झळकल्या आहेत.
अनेक विभागातील सतर्क नागरिक वेळोवेळी या त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत असतात. परंतु दुसऱ्या बाजूला अनेक बेजबाबदार नागरिक प्रशासन ना शिस्त अशाप्रमाणे वावरताना दिसून येतात.
गांधीनगर फळ मार्केट रस्त्यावरही सातत्याने याचा प्रत्यय येतो. प्रत्येकवेळी प्रशासनानेच आपली जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडावी अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांना स्वतःची जबाबदारीही ओळखायची गरज आहे.
गांधीनगर परिसरातील फळ मार्केट जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करण्यात येतात. याठिकाणी अनेक गॅरेज आहेत. या गॅरेजमध्ये वाहने रिपेरीं करून घेण्यासाठी आलेले नागरिक तसेच गॅरेजमधील वाहने बेशिस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा थांबविण्यात येतात. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी सातत्याने होत असते. अनेकवेळा अपघातही आमंत्रण मिळते. सध्या गांधीनगर रास्ता बंद असल्यामुळे याच फळ मार्केटजवळून वाहतूक वळविलेली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा थांबलेली वाहने आणि वाहतूक यामुळे वाहतुकीची कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे. यासंदर्भात रहदारी पोलीस विभागाने कारवाई करण्यासहीत नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून वागण्याची गरज आहे.