केंद्रीय मंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या स्मरणार्थ नवी दिल्ली येथील लिंगायत स्मशानभूमीमध्ये “अंगडी स्मारक” उभारण्याची योजना कर्नाटक राज्य शासन आखत आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले.
बेळगांव येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्यानंतर बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी उपरोक्त माहिती दिली. आपल्या खात्याचे काम समर्थपणे हाताळण्या व्यतिरिक्त दिल्ली येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात सुरेश अंगडी यांचा सिंहाचा वाटा आहे.
यासाठी दिल्ली येथे संबंधित स्मशानभुमीत अंगडी यांचे स्मारक उभारण्याची तयारी राज्य शासनाने सुरू केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अंगडी यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिवंगत सुरेश अंगडी यांचा स्वभाव आणि वैशिष्ट्यांची प्रशंसा केली. ते हॉस्पिटलमध्ये असताना आपण त्यांची भेट घेतली होती आणि कोरोनातून लवकर बरे होऊन पुन्हा कामाला लागा, असे आपण त्यांना म्हणालो होतो असेही मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अंगडी कुटुंबीयांशी बोलताना सांगितले.
दिवंगत सुरेश अंगडी यांचे निकटवर्ती असणारे ज्येष्ठ मंत्री जगदीश शेट्टर यांनी रेल्वे मंत्री झाल्यानंतर अंगडी अतिशय वेगाने कामाला लागले होते असे सांगून अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच त्यांनी राज्यात नवे रेल्वे मार्ग निर्माण केल्याचे सांगितले. याप्रसंगी गृहमंत्री बसवराज बोम्मई आमदार अनिल बेनके आदी उपस्थित होते.