सुळगा -हिंडलगा येथील मार्कंडेय नदीवरील फुटलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्याचा, तसेच पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिला आहे.
यंदा मुसळधार पावसामुळे सुळगा -हिंडलगा येथील मार्कंडेय नदीवरील बंधारा फुटला आहे. अलीकडेच घडलेल्या या घटनेमुळे या परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात सुळगा हिंडलगा येथील शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी सर्किट हाऊस येथे जिल्हा पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
त्यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी लघु पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी चितवाडे यांना फुटलेल्या बंधाऱ्याची तात्काळ पाहणी करून उद्याच्या उद्या बंधारा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचा आदेश दिला.
त्याचप्रमाणे बंधारा फुटून नदीच्या पाण्यामुळे शेत पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याचे सर्वेक्षणही करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.
याप्रसंगी माजी महापौर शिवाजी सुंठकर, एपीएमसीचे माजी अध्यक्ष आप्पा जाधव, विनायक कदम, पुंडलिक पावशे, परशराम तुप्पट आदींसह सुळगा -हिंडलगा येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.