गेल्या सलग 8 महिन्यांपासून सौंदत्ती श्री यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तांवर परत एकदा निराश होण्याची वेळ आली आहे, कारण भक्तांसाठी हे देवस्थान बंद ठेवण्याच्या कालावधीत आणखी एक महिन्याने वाढ करण्यात आली आहे.
बेळगांवचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यासंदर्भातील आदेश नुकताच जारी केला आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून सौंदत्ती यल्लमा देवस्थान भाविकांसाठी आणखी महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या 22 मार्च 2020 पासून बंद असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा आणि चिंचली -रायबाग येथील श्री मायाक्का देवस्थान आता येत्या 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत भक्तांसाठी बंद राहणार आहे. कोरोनाग्रस्त महाराष्ट्रातून सौंदत्ती यल्लमा देवस्थानाला भेट देणाऱ्या भक्तांची संख्या फार मोठी आहे.
त्यामुळे विषाणू संसर्गाचा धोका वाढणार असल्यामुळे उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. तथापि देवस्थानातील धार्मिक विधी रोजच्या रोज नेहमीप्रमाणे सुरू असल्याची माहिती देवस्थानचे सचिव रवी कोटारगस्ती यांनी दिली आहे.