बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला.शहापूर, महात्मा फुले रोडवरील ” जॉकी ” या अंडर गारमेंट दुकानात अंडर गारमेंटची जाहिरात करण्यासाठी केवळ अंडर घातलेल्या महिलेचा पुतळा उभारण्यात आला असून महिलेचा अवमान करणारा हा पुतळा दुकानातून हटविला जावा यासाठी बेळगाव जिल्हा शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
शिवसैनिकांनी सदर दुकानाच्या व्यवस्थापकाला याबद्दल जाब विचारून पुतळ्याच्या रूपाने केवळ जाहिरातीसाठी महिलेचे विभत्स दर्शन घडवून महिलांचा अवमान करणाऱ्या या पुतळ्याला त्वरित हटवावे अशी मागणी वजा सूचना शोरूम चालकाला करण्यात आली.
अशा पुतळ्यामुळे एक प्रकारे महिला वर्गाचा अवमान होतो. यासाठी हा पुतळा हटवावा असे राज्य सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी म्हणाले.जाहिरातीच्या नावाखाली असे अश्लील पुतळे उभे करून संस्कार मोडीत काढले जाऊ नयेत असे जिल्हा उपप्रमुख बंडू केरवाडकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी केरवाडकर यांनी, असे पुतळे उभारल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असे म्हटले.
पुतळा त्वरित हटवून महिलांचा मान राखावा, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईल मध्ये असे अश्लील पुतळे हटविले जातील, असे तालुका प्रमुख सचिन गोरले यावेळी बोलताना म्हणाले तर जाहिरातीच्या नावाखाली असे अश्लील पुतळे उभे करणे, महिला वर्गाचा अवमान करणारे आहेच, शिवाय असे अश्लील पुतळे पाहून युवा वर्गाच्या भावना भडकविल्या जातात आणि अशातून समाजाला आणि संस्काराला काळीमा फासणाऱ्या घटना समाजात घडतात असे जिल्हा संघटक रवींद्र जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
याप्रसंगी उप तालुका प्रमुख पिराजी शिंदे, प्रकाश राऊत, विजय सावंत, राजू कणेरी, जिल्हा संघटक रवींद्र जाधव यासह युवा सैनिक उपस्थित होते.जॉकी अंडर गारमेंट च्या व्यवस्थापकाने सेनेच्या सूचनेचा मान राखून हा अश्लील पुतळा दुकानातून हटविण्याबद्दल कंपनीच्या वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.