मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पहात आहोत. आज नवरात्रीची नववी माळ.. यानिमित्ताने रंगीबेरंगी कलाविष्काराच्या दुनियेतील यशस्वी उद्योजिका सुचिता पाटील यांच्याशी केलेली बातचीत…
कलाकार आणि कला यांच्यातलं नातं फार सुंदर आहे. लेखनकला, चित्रकला, संगीत, नृत्य, वादन आणि अश्या कितीतरी कलांद्वारे जेव्हा प्रकृतीला व्यक्त करायचं असतं तेव्हा कलाकार आणि कला त्याच्यातील हितगुज म्हणजे ती प्रतिभा बहराला येणं. हा सर्व संवाद बाहेरच्या जगासाठी अव्यक्त असतो. कलाकार आपली कला सगळ्यांसमोर सादर करत असताना जरी भौतिक अर्थानी समोर दिसत असेल पण मनातून केव्हाच त्यांनी स्वतःला त्या कलेच्या स्वाधीन केलेलं असतं. स्वतःला कलेशी बांधून आजतागायत कला जपून ती इतरांपर्यंत पोहोचविणारी महिला कलाकार म्हणजे सुचिता पाटील.
बेळगाव शहरात मध्यमवर्गीय कुटुंबातील सुचिता पाटील यांनी आपल्या कलेच्या जोरावर आजपर्यंत अनेक महिलांना कलाविष्काराने रंगून टाकले आहे. आजच्या जमान्यात अनेकांना कलेची आवड जोपासण्यासाठी वेळ नसतो. परंतु आपला संपूर्ण वेळ हा कलेमध्येच गुंतवून या कलेच्या आधारेच सर्वसामान्य मुलीपासून यशस्वी उद्योजिका बनण्याचा मार्ग गेली ३१ वर्षे त्या चालत आहे. वेळ बदलत गेला तशी नवनवी कला जगासमोर येऊ लागली. या कला आत्मसात करून इतरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुचिता पाटील करतात. कॅलिग्राफी, म्युरल्स, डायकट आर्ट, सस्पेसो आर्ट, डेकोपेज आर्ट, मिक्समिडीया आर्ट, कॅनव्हास पैंटिंग, पॉट पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, फूल मेकिंग, तोरण, पेपर क्राफ्ट, चित्रकला आणि अशा बऱ्याच कला सुचिता पाटील या आजही जपतात.
बीएडपर्यंत शिक्षण घेऊन मुलांना बंदिस्त शिक्षण देणे आपल्याला मान्य नाही. शिक्षण ही काळाची गरज आहे. परंतु केवळ अभ्यासी शिक्षण प्रत्येकाने आत्मसात करणे यासोबतच मुक्त शिक्षणाचा लाभही प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि आपल्या मनातील भावरंग हे वस्तुस्थितीत आणले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. म्हैसूर येथे अत्यंत बिकट परिस्थितीत कलेचे प्रशिक्षण घेऊन दहावीनंतर कला क्षेत्रात पाऊल टाकलेल्या सुचिता पाटील यांनी याचवर्षापासून कलाक्षेत्रातील वस्तू बनविण्यासाठी शिकवण्या सुरु केल्या.
सुचिता पाटील यांच्यातील कलाविष्कार पाहून अनेक महिलांनी त्यांच्याकडून कलेचे शिक्षण घेतले. आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील एक युवती ही आजची यशस्वी उद्योजिका बनली आहे. गरिबीतून वर आलेल्या सुचिता पाटील यांनी आज यशाचे अत्युच्च शिखर गाठले आहे. बेळगावमधील यशस्वी महिला उद्योजिकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. केंद्रीय विद्यालयात त्यांनी ६ वर्षे नोकरी केली आहे. तर फेविक्रील या नामांकित कंपनीमार्फत विविध शाळा आणि संस्थांमधून त्या कलेचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना आविष्कार संस्थेचा उद्योजिनी पुरस्कार, उत्सवसखीचा बेस्ट लेडी पुरस्कार, आणि आरएलएस महाविद्यालयाचा ‘सेल्फ मेड लेडी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कलेला केवळ बेळगावातच नाही तर परदेशातही खूप मोठी मागणी आहे.
कला क्षेत्रातील त्यांच्या या भरभराटीला आणि त्यांच्या कार्याला ‘बेळगाव लाईव्ह’चा सलाम आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
-वसुधा कानूरकर सांबरेकर