शहरातील महात्मा फुले मार्केटमधील व्यापारी गाळ्यांचा सातत्याने सूचना देऊन देखील दुरुपयोग केला जात असल्यामुळे बेळगाव महापालिकेने आज मंगळवारी सदर मार्केटचे प्रवेशद्वार पोलीस संरक्षणात सील केले.
महात्मा फुले मार्केट(जुने कांदा मार्केट) येथे महापालिकेने ही कारवाई सुरू केली त्यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी या कारवाईस आक्षेप घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला. तसेच संबंधित गाळ्यांचे भाडे महापालिकेकडे भरलेले असताना ही कारवाई का? शिवाय कारवाईची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही ? आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावेळी गाळेधारकांच्या वकिलांनी महापालिकेची कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.
महात्मा फुले मार्केटमधील संबंधित गाळेधारकांना हटविण्यास न्यायालयाची स्थगिती आहे असे सांगून कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी बजावलेल्या आदेशाची प्रत दाखविण्याची मागणी वकिलांनी केली. त्यावेळी महापालिकेचे कायदेशीर सल्लागार ॲड. यू. डी. महंतशेट्टी यांनी उलट जाब विचारताना तुमच्याकडे न्यायालयीन स्थगिती आदेश असल्यास त्याची प्रत प्रथम दाखवा अशी मागणी केली. यावेळी महापालिकेचे महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी हस्तक्षेप करून आम्ही आमची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करू पण ही कारवाई थांबणार नाही असे ठामपणे सांगितले. तसेच तुमचा आक्षेप असल्यास तुम्ही मनपा आयुक्तांना येऊन भेटा असा सल्लाही त्यांनी दिला.
महापालिकेचे कर्मचारी टाळे ठोकण्याची कारवाई करत असताना कांही व्यापाऱ्यांनी त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना रोखले. सदर गाळ्यांचा दुरुपयोग होत असल्याने महापालिका ही कारवाई करत आहे. कोणत्याही गाळेधारक अन्याय केला जाणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या कामात कोणीही अडथळा आणू नये असे पोलीस निरीक्षक शिवयोगी यांनी बजावले. त्यानंतर पोलीस संरक्षणात व्यापारी गाळ्यांचे प्रवेशद्वार पत्रे मारून सील करण्यात आले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी सुसज्ज अशा या व्यापारी संकुलाचा दुरुपयोग होत असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. शहरातील रस्त्यावर बसून साहित्य व भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी संकुलाची डागडुजी करण्याबरोबरच याठिकाणी आवश्यक त्या मूलभूत नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही अनिशेट्टर यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या उपरोक्त कारवाई प्रसंगी पालिकेचे मार्केट निरीक्षक नंदू बांदिवडेकर, फारूक यड्रावी, बाबू माळन्नावर यांच्यासह महसूल निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, वार्ड क्लार्क आणि महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.