मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पाहणार आहोत.. आज नवरात्रीची चौथी माळ.. यानिमित्ताने बेळगावमधील मतिमंद (विशेष) मुलांच्या शाळेसाठी कार्य करणाऱ्या गायत्री यतीन गावडे यांच्याशी केलेली बातचीत…
मतिमंद मुलांना वाढवणे हे अगदी चिकाटीचे आणि सहनशीलतेचे काम आहे. हे करताना दोन उद्दिष्टे असतात. खरे तर अशा मुलांसाठी मतिमंद या शब्दापेक्षा विशेष मूल हा शब्द जास्त चांगला वाटतो. जास्तीत जास्त काय काय करू शकेल ते ठरवून त्याप्रमाणे प्रशिक्षण देत राहणे. आणि त्या मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगता यावे, यासाठी त्यांना तयार करणे. बेळगावमधील अशा मतिमंद मुलांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या गायत्री गावडे यांनी हे आव्हान स्वीकारले आणि याच आव्हानासोबत त्या अशा मुलांसाठी चन्नम्मा नगर येथे अंकुर आणि छाया कर्णबधिर अशा दोन शाळा चालवितात.
मूळच्या कारवारच्या आणि लग्नानंतर बेळगावमध्ये आलेल्या गायत्री गावडे यांना एका आजाराने ग्रासले. आपल्या आजारपणातून त्यांना आलेला अनुभव खूपच कटू होता. अचानकपणे आलेल्या आजारामुळे त्या स्वतः १ वर्षभर अंथरुणाला खिळून होत्या. केएलई रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गायत्री गावडे यांना आपल्या आजारपणात आपले अवयव हालत नाहीत, या गोष्टीचा विचार करण्यास भाग पाडले. आपले आजारपण हे तात्पुरते असून औषधोपचाराने आपला आजार बरा होऊ शकतो. परंतु समाजात अशा कायमच्या आजारांनी ग्रासलेल्या मुलांचे काय होणार? हा विचार मन हेलावून टाकणारा होता. त्याचक्षणी मनाचा निश्चय पक्का करून अशा विशेष मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, हा विचार मनात ठेऊन त्यांनी २०१२ साली अंकुर या विशेष मुलांच्या शाळेची स्थापना केली. त्यानंतर सातत्याने ९ वर्षे त्यांनी ही शाळा सुरु ठेवली आहे. यादरम्यान
यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात मुलांचा अभ्यासक्रम तयार करणे, त्यांना स्वच्छतेविषयी माहिती देणे, त्यांना स्वत:चे काम स्वत: करण्यास लावून स्वावलंबी होण्यास मदत करणे यापासून केली. आपला संपूर्ण वेळ त्या या विशेष मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. त्यांचे काम पाहून लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले व त्या तऱ्हेने अनेक लोक या शाळेशी जोडले गेले.
या शाळेमध्ये सुमारे ६० मुले असून ३ वर्षांपासून ५० वर्षांपर्यंची मुले आहेत. या प्रत्येक मुलाला दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक सवयींपासून ज्ञानाचे धडे दिले जातात. या सर्व मुलांचा सांभाळ करण्यासाठी गायत्री गावडे यांच्या व्यतिरिक्त आणखी ३ प्रशिक्षक देखील ही जबाबदारी सांभाळतात. केवळ दैनंदिन आयुष्यातील सवयी आणि शिक्षणच नाही तर याव्यतिरिक्त इतर गोष्टीही या शाळेच्या माध्यमातून शिकवल्या जातात. या शाळेतून एका मुलीने पोहण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर तर आणखी एक मुलाने आंतरराज्य पातळीवर आपला सहभाग दर्शवून उत्तम कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त एका मुलाने आपल्या या आजारावर मात करून सर्वसामान्य आयुष्य जगण्याकडे सुधारणात्मक पाऊल टाकले आहे हे विशेष!
मतिमंद शिक्षणाचे बीज रोवणे हे खडतर आव्हान आहे. ते आव्हान गायत्री गावडे यांनी स्वीकारले. अशा प्रकारच्या विशेष मुलांच्या जीवनात त्यांच्यासाठी खास शाळा सुरू करून आशेचा किरण दाखवला. विशेष मुलं वाढवणं, ही खरंच तारेवरची कसरत असते. या मुलांना वाढवताना समाजाच्या काहीशा उत्सुक आणि सहानुभूतिपूर्ण, तर क्वचित उपहासात्मक नजरांचा सामना करताना त्यांच्या पालकांची होणारी ओढाताण तर शब्दातीत असते. असं मूल का जन्माला आलं, याचं उत्तर कोणाकडेही नसते. त्याचा स्वत:चा आणि त्याच्या आईवडिलांचा काहीही दोष नसताना त्यांना हे अग्निदिव्य पार पाडावं लागतं. या विशेष मुलांसाठी काहीतरी करावं, या उद्देशाने सुरू केलेल्या ‘अंकुर’ संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे आणि त्यांच्या डोक्यावर सावली धरता धरता विशेष मुलांच्या पालकांची झोळी समाधानाने भरून गेली आहे. या मुलांच्या पालकांच्या आधाराचा उभारणीत महत्वाचा वाटा होता. कारण विशेष मुलांच्या समस्यांची जाणीव आणि कल्पना त्यांना चांगल्याप्रकारे माहित होती. ‘अंकुर’ मधील मानसिकदृष्ट्या अपंग मुलांच्या चेहर्यावरील समाधान बरेच काही सांगून जाते. गेल्या ९ वर्षात या मुलांसोबत भावनिक नाते जोडले गेले असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधानाने दिवसाची सांगता होते, अशी प्रांजळ कबुलीही गायत्री गावडे देतात.
मतिमंद असूनही या मुलांना स्वावलंबी जीवनाचे धडे या ठिकाणी दिले जातात. मुलांचा केवळ सांभाळ न करता त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना कामे शिकवली जातात. यातील विशेष काम म्हणजे पेपर बॅग्स तयार करणे. अशी अनेक कामे या ठिकाणी मुलांकडून करून घेतली जातात. यातून तयार होणा-या वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवून त्याद्वारे मिळणार्या उत्पन्नातून या मुलांच्या संगोपनाला हातभार लागतो. मुलांच्या कामातून मिळणारे हे उत्पन्न, पालक तसेच इतर देणगीदारांची देणगी यातूनच संस्थेचा पूर्ण कारभार चालतो. याशिवाय या कलाकुसरीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ५० टक्के भाग हा त्याच मुलांना देण्यात येतो. याशिवाय या मुलांच्या फिसिओ थेरपीसाठी बेळगावच्या केएलई रुग्णालयातील डॉक्टरांचाही हातभार लागतो.
या कामासाठी गायत्री गावडे यांना त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारची मदत या मुलांसाठी करायला त्या सदैव तत्पर असतात, असे त्या सांगतात. शिवाय समाजातील प्रत्येक माणसाने आपल्या परीने समाजासाठी बांधिलकी म्हणून आपल्या दैनंदिन आयुष्यातील थोडा वेळ हा समाजकार्यासाठी द्यावा, अशी त्यांची समाजाकडून आशा आहे. प्रत्येक गरज ही पैशातून भागात नाही. तर अशाच प्रकारच्या अनेक गरजू गोष्टींसाठी आपले श्रमदान महत्वाचे आहे. महिलांच्या बाबतीत बोलायचे असेल, तर प्रत्येक स्त्रीने केवळ चूल – मूल आणि संसार यातच गुरफटून न राहता व्यापक विश्वात सामील होऊन गरजवंतासाठी मदतीचा हात पुढे करावा, असा सल्लाही त्या देतात.
समाजातील विशेष अशा मुलांसाठी अप्रतिम कामगिरी बजाविणाऱ्या गायत्री यतीन गावडे यांच्या या कार्याला ‘बेळगाव लाईव्ह’ चा सलाम. आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !
-वसुधा कानूरकर सांबरेकर