मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पूरपरिस्थितीमुळे अनेक घरांची पडझड झाली. याचे सर्व्हेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्तांना घरांच्या पुनर्बांधणीसाठी भरपाई देण्यात यावी, अशी सूचना महसूल विभागाचे मंत्री आर. अशोक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. अतिवृष्टी आणि पूरव्यवस्थापनासंबंधित उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज जिल्हा पंचायतीच्या सभागृहात प्रगती आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. तांत्रिकरीत्या बोगस वाटणारे अर्ज रद्द करून उर्वरित प्रत्येक नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे तसेच येत्या दोन महिन्यात सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे आदेश आर. अशोक यांनी दिले आहेत.
यासोबतच पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असून सरकारच्यावतीने नुकसानभरपाई देण्यात आली आहे. परंतु नुकसान भरपाईची रक्कम अजूनपर्यंत पोहोचली नसल्याच्या तक्रारी आल्या असून घरे पुनर्बांधणीसाठी देण्यात येणारी नुकसान भरपाई त्वरित देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.
जिल्ह्यातील सुमारे ६००० घरांच्या पुनर्बांधणीसाठी भरपाई जाहीर करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५०० घरे बांधून तयार झाली आहेत. ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्याची करणे शोधावी अशी सूचनाही मंत्री आर अशोक यांनी केली.
याव्यतिरिक्त ऊस आणि इतर पीक नुकसान ग्रस्तांनाही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या असून पूरग्रस्त भागासाठी जाहीर करण्यात आलेल्या निधीचा दुरुपयोग होता कामा नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, बुडा अध्यक्ष घोळाप्पा होसमनी, अल्पसंख्यांक विकास मंडळाचे अध्यक्ष मुख्तार पठाण, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन सी. व्ही. यांच्यासह इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.