बेळगाव जिल्ह्यातील रुग्णालयांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जुने बेळगाव येथे आयएमएच्या वतीने प्रकल्प राबविण्यात येत आहे. मागील 10 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकल्प या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनत आहे.
या प्रकल्पांतर्गत संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील रुग्णालयाचा कचरा म्हणजेच ‘मेडिकल वेस्ट’ हा याठिकाणी जाळण्यात येतो. या प्रक्रियेनंतर धुराचे लोळ जुने बेळगाव आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरत आहेत.
हे धूर संपूर्ण परिसरात पसरल्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याशी संबंधित अनेक त्रास होत आहेत. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पीपीई किटसहित इतर कचरा येथे जाळण्यात येतो.
यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त तसेच आरोग्य विभागाशी वारंवार संपर्क साधून याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी बागेवाडी येथे जागा मंजूर करण्यात आली आहे. परंतु तरीही याठिकाणी हा प्रकल्प हटविण्यासाठी कोणतीही हालचाल करण्यात येत नाही.
काही दिवसांपूर्वी या भागातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे हे काम त्वरित थांबविण्यासाठी निवेदन दिले होते. दरम्यान केवळ 8 दिवस येथील काम बंद होते. परंतु पुन्हा हे काम सुरू करण्यात आल्यामुळे नागरिक संतापले आहेत.
जुने बेळगाव येथील हा प्रकल्प त्वरित हटविण्यात आला नाही तर आंदोलन करून या प्रकल्पाला टाळे ठोकण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.