गेले ५ ते ६ दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला असून त्याचा फटका जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना बसला आहे. या परतीच्या पावसात एका व्यक्तीचा जीव गेला तर ६ जनावरे आणि ३५ हजार हेक्टर मधील पिके नष्ट झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली आहे.
शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली असून, पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना प्रशासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
ऑक्टोबर मध्ये जवळपास ६२ घरे पावसामुळे पूर्णपणे कोसळली आहेत. तर ७० घरांना पावसामुळे नुकसान पोहोचले आहे. अजूनही याचे सर्व्हेक्षण सुरु असून यांनाही नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
याचप्रमाणे पावसामुळे सुमारे ३५ हजार हेक्टर परिसरातील पिके नष्ट झाली असून आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना ६ कोटी २ लाख रुपये नुकसानभरपाईच्या स्वरूपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात ऑकटोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे कोठेही पूर आला नाही. परंतु पावसामुळे अनेक कुटुंबाचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या पावसाचा फटकाही कर्नाटकातील काही जिल्ह्यांना बसतो. पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.