शहरातील श्री गणेशोत्सव मिरवणूक, श्री शिवजयंती मिरवणूक, श्री बसवेश्वर जयंती, मिरवणूक श्री आंबेडकर जयंती मिरवणूक आदी मिरवणुका ज्या मार्गावरून जातात त्या मार्गांवर डेकोरेटिव्ह लाइट्स बसवून सुशोभिकरण करावे ही जनतेची मागणी आणि माझा संकल्प मी आज पूर्ण करत असून या विकास कामांसाठी 1 कोटी 20 लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
कित्तूर चन्नम्मा सर्कल ते गणपत गल्ली सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या विकास कामाचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. आमदारांच्या हस्ते विधीवत पूजन करून कुदळ मारण्याद्वारे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार बेनके यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले की, शहरातील श्री गणेशोत्सव मिरवणूक, श्री शिवजयंती मिरवणूक, श्री बसवेश्वर जयंती मिरवणूक, श्री आंबेडकर जयंती मिरवणूक आदी मिरवणुका ज्या मार्गावरून जातात त्या मार्गांवर डेकोरेटिव्ह लाईट बसून सुशोभीकरण करावे, अशी मागणी जनतेने माझ्याकडे केली होती.
त्याचा पाठपुरावा करून आज मी माझे आश्वासन पूर्ण करत आहे. आता शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, काकती वेस आदी संपूर्ण मिरवणूक मार्गावर थेट हेमु कलानी चौकापर्यंत डेकोरेटिव्ह लाईट्स बसवून सुशोभिकरण केले जाणार आहे. यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
याव्यतिरिक्त 50 लाख रुपये खर्चून कित्तूर चन्नम्मा सर्कल ते गणपत गल्ली सर्कलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे या पद्धतीने एकूण सुमारे 2 कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करून रस्त्याच्या कामाबरोबरच डेकोरेटिव्ह लाइट्स बसवून मिरवणूक मार्गाचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प मी आज पूर्ण करत आहे, असेही आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.