शहरातील कांही ही खाजगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना वरील उपचारासाठी भरमसाठ पैसे वसूल करून सर्वसामान्य गरीब लोकांची लुबाडणूक केली जात आहे. ही लुबाडणूक तात्काळ थांबून संबंधित हॉस्पिटल्सवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील खाजगी हॉस्पिटल्सकडून मोठ्याप्रमाणात लुबाडणूक झालेल्या संतप्त नागरिकांनी उपरोक्त मागणी केली असून तशा आशयाचे निवेदन आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली आहे. या परिस्थितीत कोरोनावरील उपचारासाठी खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातलगांकडून उपचार खर्चाच्या नांवाखाली लाखो रुपये उकळले जात आहेत. शहरातील बहुतांश जनता ही सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातील आहे त्यामुळे त्यांना उपचाराचा अव्वाच्या सव्वा खर्च न परवडणारा आहे.
खाजगी हॉस्पिटल ची बिले भागवता भागवता अनेक जणांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तेव्हा शासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करून खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीला आळा घालावा, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले त्याचप्रमाणे यापुढे तरी खाजगी हॉस्पिटल्सकडून सर्वसामान्यांची लुबाडणूक होऊ नये हा या मागचा उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी किर्ती पाटील यांनी शहरातील स्पंदन हॉस्पिटल आणि लेक व्ह्यू हॉस्पिटल या दोन खाजगी हॉस्पिटलचा उल्लेख करताना या दोन्ही हॉस्पिटलमधील निष्काळजीपणामुळे कोरोनावर उपचार घेणाऱ्या आपल्या 31 वर्षीय भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.
भावावरील उपचारासाठी आपल्या कुटुंबीयांनी स्पंदन हॉस्पिटलमध्ये सुमारे 7 -8 लाख रुपये आणि लेक व्ह्यू हॉस्पिटलमध्ये 10 ते 12 लाख रुपये खर्च करून देखील शेवटी काहीच उपयोग झाला नसल्याचे त्यांनी खेदाने सांगितले.