ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या संगणक उताऱ्याचे सरकारी शुल्क 50 रुपये असताना सुळगा -हिंडलगा ग्रामपंचायतीचे पीडीओ नागरिकांकडून तब्बल 500 रुपये उकळत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सुळगा येथील माजी सैनिक उमेश नारायण आपटेकर यांची राकसकोप मार्गावरील केईबी कार्यालयासमोर स्वतःची जमीन आहे सदर जमीन आपटेकर यांनी आपल्या पत्नीच्या नांवे खरेदी केली आहे. आपटेकर यांना कांही कारणास्तव या जमिनीच्या उताऱ्याची गरज होती.
तेंव्हा आज सकाळी सुळगा -हिंडलगा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांनी 50 रुपये भरून जमिनीचा संगणकीय उतारा घेतला. मात्र ग्रामपंचायतीच्या महिला पीडीओंनी आक्षेप घेऊन उमेश आपटेकर यांच्याकडून 50 नाही तर 500 रुपये भरून घेण्यास सांगितले. यावर आपटेकर यांनी सरकारी आदेशाप्रमाणे 50 रुपये शुल्क असताना आपण 500 रुपये का वसूल करता? असा जाब विचारला. यावरून उभयतांत शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पीडीओंनी अरेरावीची भाषा करत पैसे परत मिळणार नाहीत कोणाकडे तक्रार करायची असेल त्याच्याकडे करा, असे उद्धटपणे आपटेकर यांना सांगितले.
सुळगा -हिंडलगा ग्रामपंचायतीच्या पीडीओंच्या या उद्धट वर्तनाचा अन्य लोकांनाही अनुभव आला असल्याचे समजते. तसेच नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्याच्या त्यांच्या अवैध कृतीबद्दल संताप व्यक्त होत आहे. तरी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सुळगा -हिंडलगा ग्रामपंचायतीच्या पीडीओंना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी केली जात आहे.