बेळगांव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा दणका सुरू आहे. परतीच्या पावसाने झोडपायला सुरुवात केल्यामुळे भात, भुईमूग नाचण्यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत अडकलेला शेतकरीवर्ग अधिकच हवालदिल बनला आहे.
बेळगांव शहर परिसरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सातत्याने पडणार्या पावसामुळे कापणी केलेल्या भात पिकात पाणी साचून नुकसान झाले आहे. शिवारात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे भात पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे खरिपाच्या सर्वच पिकांना फटका बसला आहे. पावसात दिसल्यामुळे भात काळे पडत असून उत्पादनातही घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या शेतातील भुईमूग साचलेल्या पाण्यात भुईसपाट झाले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीस आलेली खरीप पिके भाजीपाला व फुलांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे भात कापणीही करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा मान्सूनला प्रारंभ झाल्यानंतर कांही दिवस पावसाचा जोर कमी होता. मात्र त्यानंतर सातत्याने जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
कुद्रेमनी परिसरात मंगळवारी दुपारी मोठा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सुगीच्या हंगामात पडलेल्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी रताळी काढणी व भात कापणीची कामे ऐन भरात आहेत. कापलेली माळरानातील भात पिके भिजून गेली असून कांही ठिकाणी मळण्या काढण्याची कामे अर्धवट आहेत. एकंदर भात कापणी व मळणीची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली आहे.