Monday, December 23, 2024

/

जुन्या पी. बी. रोडवरील मिळकतींचे दर आज देखील तेजीत!

 belgaum

शहरातील आरटीओ सर्कल ते माणिक बागपर्यंतचा जुना पी. बी. रोड हा विविध व्यवसायांसाठी महत्त्वाचा मानला जातो. नवा पुणा -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर देखील या जुन्या महामार्गाचे महत्व कधीच कमी झालेले नाही. या मार्गावरील आरटीओ सर्कल ते माणिकबाग पर्यंतच्या टप्प्यातील मिळकतींचे बाजार मूल्य आज देखील चढेच आहे.

वाहनांच्या खरेदीपासून दुरुस्तीपर्यंत आणि वाहन नोंदणीपासून परमिटपर्यंत सर्व प्रकारची कामे करण्यात येणारा मार्ग म्हणजे शहरातील जुना पी. बी. रोड हा मार्ग होय. सदर मार्ग सीबीटी मार्गे आरटीओ सर्कलपर्यंत जोडला गेला आहे. विविध कारणांनी या मार्गावरील आस्थापनांचे दर वाढत गेले आहेत. आरटीओ सर्कलपासून माणिक बागकडे जाणाऱ्या जुन्या पी. बी. रोड या रस्त्यावर वेगवेगळे व्यवसाय थाटलेले आहेत. हा रस्ता मध्यवर्ती बस स्थानकालाही जोडला गेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात खुल्या जागा होत्या. मात्र विविध व्यवसायांसाठी अनेकांनी येथील जागांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

या रस्त्यावर विविध चारचाकी वाहनांची व दुचाकी वाहनांची शोरुम आहेत. सदर रस्त्याला लागूनच मध्यवर्ती बस स्थानक असल्यामुळे हॉटेल, लॉजिंग, स्वीट मार्ट मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जागेला अत्यंत महत्त्व आहे. सध्या आरटीओ सर्कल ते माणिकबाग पर्यंतच्या टप्प्यातील निवासी मालमत्तांचा दर 3,960 रुपये प्रति चौरस फूट तर व्यावसायिक मिळकतींचा दर 9,570 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे.Old pb road bgm

माणिक बागच्या पुढील भागात असलेल्या मार्गावरील मालमत्तांचे दर मात्र कांही प्रमाणात कमी आहेत. पुढील भागात निवासी मालमत्तांचे दर 3,500 रुपये प्रति चौरस फूट असून व्यवसायिक मालमत्तांचा दर 5,060 रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. फोर्ट रोडचे दरही मागील कांही वर्षांच्या तुलनेत बरेच वाढले आहेत. याठिकाणी निवासी मिळकतींचा दर 3,000 रुपये प्रति चौरस फूट तर व्यावसायिक जागेचा दर 4,200 रुपये प्रति चौरस फूट आहे. तथापि या ठिकाणी निवासी मालमत्ता शिल्लक नाहीत. मात्र एखाद्या वेळी आढळल्यास तिचे बाजार मूल्य प्रतिचौरस फूटास 3,000 रुपये ठरविण्यात आले आहे.

शहरातील कोट कंपाउंड येथील निवासी मालमत्तांचा दर प्रति चौरस फूट 3,960 आणि व्यवसायिक मालमत्तांचा दर प्रति चौरस फूट 5,600 रुपये इतका आहे. तुलनात्मक दृष्टीने विचार केल्यास कित्तूर चन्नम्मा चौकापासून कोर्ट कंपाउंड मार्गे आरटीओ सर्कलपर्यंत जाणारा संगोळ्ळी रायण्णा मार्ग मालमत्तांच्या दराच्या बाबतीत जुन्या पी. बी. रोडच्या दृष्टीने समांतरच आहे. येथील व्यावसायिक मालमत्तांचा दर 5,544 प्रति चौरस फूट आणि निवासी मालमत्तांचा दर 3,960 रुपये असा आहे. याठिकाणी सद्यपरिस्थितीत नव्या मालमत्ता मिळणे कठीण आहे. मात्र उपलब्ध मालमत्ताधारकांनी आपली मालमत्ता विक्रीस काढल्यास दराची मर्यादा कोट्यवधींच्या घरात जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.