बेळगाव शहरात अजूनही म्हणावी तशी कोविड बाबत जनजागृती झाली नाही. सरकारकडून सातत्याने मास्कचा वापर करण्यासाठी सल्ला देण्यात येत आहे. परंतु अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसून येत असून कोविड बाबतच्या मार्गसूचीचा फज्जा उडविताना दिसत आहेत. यासाठीच महानगरपालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली.
हि मोहीम सुरु करण्यात आल्यापासून अनेक नागरिकांमध्ये जनजागृती होईल अशी आशा मनपाला आणि पोलीस प्रशासनाला होती. परंतु कारवाईपुरते मर्यादित मास्कचा वापर करणारे अनेक नागरिक दिसून आले यामुळे पुन्हा विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तीव्र कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मास्क न परिधान केलेल्या २०३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या माध्यमातून ३७,२५० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
कोविड सारख्या सांसर्गिक रोगाने थैमान घातले असून हि रोगराई लवकरात लवकर संपविण्यासाठी आणि बाजारात लस उपलब्ध होईपर्यंत खबरदारीची उपाययोजना म्हणून जनतेच्या सुरक्षेसाठी सरकारने मार्गसूची जाहीर केली. या मार्गसूचीत जनतेच्याच हितासाठी नियम बनविण्यात आले. सुरुवातीच्या काळात गांभीर्याने वावरणारी जनता आता दिवसेंदिवस कोविड रुग्णसंख्या वाढत असूनही बेजबाबदारपणे वावरताना दिसून येत आहे. निदान दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून तरी जनतेत जागरूकता वाढेल यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सुरुवातीला विना मास्क फिरणाऱ्यांवर १००० रुपये दंड आकारला जाईल अशी माहिती देण्यात आली होती. परंतु बुधवारी स्वतः मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मास्क न परिधान करणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येकी २५० रुपयांचा दंड वसुली करण्याचा आदेश दिला होता.