सरकारने ठरवून दिलेल्या मार्गसूचीनुसार पै. महम्मद यांच्या जन्मदिनाच्या उत्सवानिमित्ताने ईद-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा उत्सव पार पडतो. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर या उत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, अशी सूचना एसीपी चंद्रप्पा यांनी केली आहे.
मुस्लिम समाजाच्या मुख्य उत्सवापैकी ईद-मिलाद हा उत्सव येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने काही मार्गसूची आखून दिल्या आहेत. या उत्सवासंदर्भात मंगळवार दि. २० रोजी मुस्लिम समाजाच्या नेत्यांसमवेत मार्केट एसीपी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत अजीम पटवेगार यांच्यासह इतर नेत्यांसमवेत चर्चा करून पारंपरिक पद्धतीने हा उत्सव अत्यंत साध्यापद्धतीने आचरणात आणण्याविषयी चर्चा करण्यात आली.
कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी झाली नसून सरकारच्या नियमावलीनुसारच ईद साजरी करण्यात येईल. परंतु फोर्ट रोड जवळील प्रार्थना स्थळाजवळ ध्वज फडकाविण्याची परवानगी आणि कमीतकमी लोकांच्यासह मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी एसीपी चंद्रप्पा म्हणाले, कि जनतेच्या सुरक्षिततेसाठी या मार्गसूची जाहीर करण्यात आल्या असून या मार्गसूचीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. परंतु तुमच्या मागणीचा विचार पोलीस आयुक्तालयाकडे पुढे पाठवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मार्केट एसीपी सदाशिव कट्टीमनी, सीपीआय जावेद मुशापुरी, सीपीआय राघवेंद्र हवालदार, बी. आर. गड्डेकर, संगमेष शिवयोगी, धीरज शिंदे यांच्यासह मुस्लिम समाजाचे नेते उपस्थित होते.