बेळगांव ते धारवाड दरम्यानच्या नियोजित रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तेंव्हा त्या नियोजित मार्ग ऐवजी आम्ही सुचविलेल्या नव्या पर्यायी रेल्वे मार्गाची योजना अंमलात आणावी, अशी मागणी बेळगांव तालुक्यातील नंदीहळ्ळी, प्रभूनगर, नागेनहट्टी व गर्लगुंजी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नंदीहळ्ळी, प्रभूनगर, नागेनहट्टी व गर्लगुंजी येथील शेतकऱ्यांनी आज बुधवारी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांनी केलेल्या सूचनेनुसार नियोजित बेळगांव -धारवाड रेल्वे मार्गाऐवजी नव्या पर्यायी रेल्वेमार्गाची योजना आम्ही मांडत आहोत. त्याच प्रमाणे यासंदर्भातील देसूर व के. के. कोप्प येथील सर्वेक्षणाचा अहवालही सादर करत आहोत. आम्ही तयार केलेल्या योजनेतील पर्यायी रेल्वे मार्गाचे फायदे व तोटे पुढील प्रमाणे आहेत. या मार्गामुळे केके खूप ते देसूर स्टेशन दरम्याचे अंतर 6.8 कि.मी. इतके कमी होणार आहे. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल.
याखेरीज या मार्गासाठी जो अंदाजे खर्च करण्यात येणार आहे त्यात जवळपास 209 कोटी रुपयांची घट होणार आहे. आम्ही सुचविला नवा पर्यायी रेल्वेमार्ग हा खडकाळ प्रदेशातून जाणार असल्यामुळे रेल्वे रूळ घालण्यासाठी खर्चाच्या दृष्टीने तो उपयुक्त ठरणार आहे. नियोजित मार्ग हा सुपीक पिकाऊ जमिनीतून जाणार असल्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. याउलट नवा पर्यायी रेल्वे मार्ग हा खडकाळ जमिनीतून जाणार असल्याने शेतकरी संबंधित जमीन स्वखुशीने रेल्वे खात्याला सुपूर्द करण्यास तयार आहेत.
तेंव्हा या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून नियोजित रेल्वे मार्गाऐवजी आम्ही सादर केलेल्या नव्या पर्यायी रेल्वेमार्गाचा विचार करण्याबाबत रेल्वे खात्याला सूचित करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी जि. पं. सदस्य गोरल यांच्यासह लक्ष्मण यादव पी. एस. कोलेकर, आर. व्ही. पाटील, सुरेश जाधव, मारुती मेलगे, व्ही. ए. पाटील, ए. व्ही. पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.