कॉलेज रोडवरील मलबार गोल्ड अँड डायमंड्स ज्वेलरी शोरूम आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील हरसनवाडी जंगलातील गरीब आदिवासी लोकांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे नुकतेच वाटप करण्यात आले.
खानापूर तालुक्याच्या जंगल प्रदेशातील आदिवासी लोकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या हरसनवाडी येथील त्यांच्या उपक्रमाची माहिती वाचून कॉलेज रोडवरील मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे स्टोअर मॅनेजर सुरज अणवेकर यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलशी संपर्क साधून आदिवासी लोकांना मदत करण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यानुसार मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्यावतीने हरसवाडी (ता. खानापूर) येथील 22 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
सदर किट्समध्ये सोनामसुरी तांदुळ, सन प्युअर खाद्यतेल, आशिर्वाद आटा, तूरडाळ, साखर आदी जीवनावश्यक साहित्यांचा समावेश होता. मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे असिस्टंट स्टोअर हेड सवद पी. आय., मार्केट एक्झिक्युटिव्ह आनंद बुलबुले आदींच्या हस्ते जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, अमित परमेकर, प्रशांत बिर्जे आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड्स सर्कल करत असलेल्या उदात्त कार्याबद्दल मलबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी शोरूमतर्फे त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आली.
दरम्यान, हरसनवाडी जंगलातील आदिवासी तांड्यातील महिलांना 2 कि. मी. पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. या महिलांचा त्रास दूर करण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या पुढाकाराने अलीकडेच 8 सायकलींचे मोफत वितरण करण्यात आले तसेच आदिवासी मुलांना स्कूल बॅग, पाटी-पेन्सिल, वह्या, पुस्तके, कपडे आणि खेळाचे साहित्य वितरीत करून या आदिवासी तांड्याला समस्या मुक्त करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले आहे. आदिवासी कातकरी समाज अतिशय मागासलेला आहे. उत्पन्नाचा कसलाही स्त्रोत नसलेल्या या आदिवासी कुटुंबांना शासनाने पक्की घरे बांधून द्यावी आणि आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी केली आहे.