कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व सण आणि उत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या दसरोत्सवावरही कोरोनाचे सावट आले आहे. बेळगाव शहरात देवस्थान समित्यांच्यावतीने सासन काठ्या आणि पालखी मिरवणूक पार पडते.
विजयादशमीदिवशी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून दसरोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात शहर देवस्थान समितीची महत्वपूर्ण बैठक आज आयोजित करण्यात आली होती.
पाटील गल्ली येथील सिद्धेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दसरोत्सव साजरा करण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. ज्योती कॉलेज येथील मैदानावर आयोजिण्यात येणाऱ्या सीमोल्लंघनाचा कार्यक्रम प्रशासनाने रद्द करण्याचा आदेश दिला आहे. परंतु याबाबत शहर देवस्थान समितीचा निर्णय अजून झालेला नसून यासंदर्भात लवकरच देवस्थान समितीच्यावतीने निर्णय जाहीर करण्यात येईल.
हा निर्णयच अंतिम राहणार असून शहरातील सर्व देवस्थान समितींनी हा निर्णय मान्य करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
यासंदर्भात शहर देवस्थान समिती, चव्हाट गल्ली देवस्थान – सासन काठी समिती, देवदादा सासन काठी समिती लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीला देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, सुनील जाधव, लक्ष्मण नाईक, राहुल जाधव, अभिजित अष्टेकर, प्रमोद बिर्जे, विजय तम्मूचे,गणेश दद्दीकर, परशराम माळी, श्रीनाथ पवार आदी उपस्थित होते.