भाषिक अल्पसंख्यांक कार्यालय बेळगाव येथेच रहावे यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच कोरोना संदर्भातील सरकारी नियमांचे पालन करून 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्याचा निर्णय आज मंगळवारी झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
आगामी 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज पार पडली. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर बैठकीत काळा दिन कशा पद्धतीने आचरणात आणावा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच त्यासाठी नेहमीप्रमाणे घटक समित्यांनी आपापल्या भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काळा दिनाबाबत जनजागृती करण्याचे ठरले. त्याखेरीज दरवर्षीप्रमाणे प्रशासनाला निवेदन देण्याचेही निश्चित करण्यात आले. यासंदर्भात विचार-विनिमयाअंती कोरोना प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन सरकारच्या नियमानुसार काळा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
काळा दिन कार्यक्रमाव्यतिरिक्त बैठकीत भाषिक अल्पसंख्यांक कार्यालय बेळगांव येथून अन्यत्र हलवले जाऊ नये याबाबत चर्चा करण्यात आली आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरले. सीमाभागातील मराठी ग्रंथालयांच्या मदतीसाठी आर्थिक सहाय्याचा जो प्रस्ताव ग्रंथालय संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे,
त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रारंभी माजी केंद्रीय मंत्री कै. प्रणव मुखर्जी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी, आमदार कै. बी. वाय. पाटील, कै. कल्लाप्पा प्रधान, कै.उदयसिंहराव सरदेसाई आदी दिवंगतांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीस माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर, एल. आय. पाटील रणजीत चव्हाण पाटील, आदींसह समितीचे पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.