कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली होती त्याच पद्धतीने आगामी दसरा उत्सवाप्रसंगी श्री दुर्गा देवीची मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कॅम्प येथील पाचही दसरा महोत्सव मंडळांनी केली आहे. यासंदर्भात आपण उद्या या मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, असे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड अनिल बेनके यांनी सांगितले.
आगामी दसरा उत्सवासंदर्भात कॅम्प येथील पाचही दसरा महोत्सव मंडळांची बैठक आज सकाळी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बेनके यांनी उपरोक्त माहिती दिली. ते पुढे म्हणाले की बेळगांव शहरातील कॅम्प येथे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा दसरा उत्सव हा राज्यातच नाही तर देशात प्रसिद्ध आहे.
या उत्सवाला 150 ते 200 वर्षांची परंपरा आहे. या उत्सवात देवीच्या ज्या पांच प्रमुख मूर्ती आहेत त्यांना मिरवणुकीद्वारे कॅम्प भागात फिरून पुन्हा घरपोच नेऊन पूजा केली जाते.
तसेच दसऱ्याच्या नऊ दिवसाच्या कालावधी देवदेवतांची पूजा करून रथोत्सव केला जातो. दरवर्षी हा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. परंतु यंदा कोविड -19 कायद्यामुळे अडचण निर्माण झाली असल्याने आज कॅम्प येथील सर्व पाचही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची इच्छा व समस्या जाणून घेण्यात आली.
कॅम्प येथील सर्व मंडळांची कोविड -19 नियमांचे पालन करून श्री गणेश विसर्जन मिरवणूकी प्रमाणे यंदाची श्री दुर्गा देवीची मिरवणूक साधेपणाने काढण्याची इच्छा आहे कोणत्याही परिस्थितीत ही परंपरा मोडली जाऊ नये असे त्यांना वाटते. या दसरा उत्सवाला आणि पर्यायाने देवीच्या मिरवणुकीला 150 ते 200 वर्षाची जुनी परंपरा असल्यामुळे साधेपणाने मिरवणूक काढण्याची परवानगी मिळावी या मागणीशी मी देखील सहमत आहे, असेही ही आमदार अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.
तसेच या संदर्भात आपण उद्या या मंगळवार दि 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रीतसर अर्ज करून कॅम्प येथील दसरा उत्सव व मिरवणूक साध्या पद्धतीने साजरी करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी कॅम्प येथील पांचही दसरा महोत्सव मंडळाचे पदाधिकारी सुनिल जाधव आदी उपस्थित होते.