बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावात रस्त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रस्ता अत्यंत खराब झाला असून त्यामुळे हा रस्ता अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी मंडोळी ग्रामस्थांनी रास्तारोको करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
त्यामुळे काही काळ गोंधळ माजला होता. मंडोळी गावात जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण बनले आहे. वारंवार तक्रारी आणि निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच नागरिकांनी संतापून रास्तारोको केला होता.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले होते. रस्त्याची डागडुजी तातडीने करावी असे निवेदन देण्यात आले. जोपर्यंत फारसा होत नाही. तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. मात्र त्यांची समजूत काढत त्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगण्यात आले.
त्यानंतर तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीकर्जून कलादगी यांनी नागरिकांची बैठक ग्रामपंचायत मध्ये घेतले आणि या समस्येचे निवारण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना समज दिली. हा रस्ता तातडीने होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतरच ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.