समितीच्या रणरागिनी नवदुर्गा ज्यांनी म. ए. समितीच्या पहिल्या महिला फळीमध्ये सीमाप्रश्नी आवाज उठवत नवी दिल्ली येथील धडक मोर्चामध्ये सहभाग दर्शवला, त्यांचा म. ए. समिती महिला आघाडीतर्फे आयोजित खास समारंभात यथोचित सत्कार करण्यात आला.
म. ए. समिती महिला आघाडी अध्यक्षा सौ. रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्षा सौ. सुधा भातकांडे आणि सचिव सौ. सरिता पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये सत्कार समारंभाचा उद्देश स्पष्ट केला. उपस्थित सत्कारमूर्ती नवदुर्गांनी त्याकाळी सीमा चळवळीत भाग घेतला म्हणूनच आज त्यांच्या प्रेरणेने आमच्या पिढीतील महिला सीमा चळवळीत कार्यरत आहेत, असे किल्लेकर यांनी सांगितले.
यावेळी सीमाप्रश्नी दिल्ली येथील समितीच्या धडक मोर्चात सहभागी झालेल्या सुलभा नाईक, पार्वती भातकांडे, कमल किल्लेकर, सावित्री नाईक, अनुसया हंगरगेकर, सुनंदा मुरकुटे, प्रभावती भालेकर, वासंती किल्लेकर व किशोरी कुरणे या नवदुर्गांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तींच्यावतीने बोलताना सुलभा नाईक, किशोरी कुरणे व प्रभावती भालेकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून म. ए. समिती महिला आघाडी समस्त महिलावर्गाला जे बहुमोल मार्गदर्शन करत आहे त्याबद्दल गौरवोद्गार काढले.
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना या रणरागिनींनी मोर्चाच्या वेळेस स्वतः घरातील भाजी भाकरी बांधून घेऊन स्वखर्चाने आपण कशा पद्धतीने मोर्चात सहभागी झालो होतो. समितीचे आमदार व समितीचे चिन्ह जिंकावे यासाठी कसे जिवाचे रान केले, याची माहिती दिली. तसेच आजही सीमाप्रश्न जिवंत राहावा यासाठी महिला आघाडी देत असलेल्या योगदानाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
यंदा कोरोनामुळे आमच्या या समारंभावर मर्यादा होत्या. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम छोट्या पद्धतीने केला आहे. दिल्ली धडक मोर्चामध्ये खूप महिला सहभागी झाल्या होत्या. आम्हाला त्या सर्वांचा सत्कार करण्याची इच्छा होती, परंतु कोरोनामुळे मर्यादा पडल्याने ते शक्य झाले नाही. तुम्हा सर्व रणरागिनींचे सीमा प्रश्नासाठीचे योगदान महिला आघाडी कधीच विसरणार नाही. तुम्ही सदैव आमच्यात आहात व राहणार आहात, असे विचार सौ. रेणू किल्लेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रिया कुडची यांनी केले. शेवटी महिला आघाडीच्या सचिव सरिता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कोरोना संदर्भातील सर्व अटी नियमांचे पालन करून उपरोक्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान आजकाल सीमा चळवळीतील महिलांचा सहभाग कमी झाला आहे. अशा परिस्थितीत हा सत्कार समारंभ आणि सत्कार मूर्तींचे मार्गदर्शनपर विचार समस्त महिलांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे मत सत्कार समारंभानंतर व्यक्त होताना दिसत होते.