बेळगाव जिल्ह्यातील वारंवार उद्भवलेल्या पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्थांना मूलभूत सुविधांसह नुकसान झालेली भरपाई त्वरित देण्याच्या सूचना जिल्हा प्रभारी सचिव तसेच ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान कार्यदर्शी एल. के. अतिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित जिल्हा प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
पुरामध्ये घरांची पडझड झालेल्यांना विविध हप्त्यांमध्ये भरपाई देऊन घर बांधकामाला सुरुवात करण्यासाठी नोट्स बजावून सरकारच्या निर्देशानुसार पुढील कारवाई हाती घेण्यात यावी, असे ते म्हणाले. पाऊस आणि कोविडमुळे ग्रामीण भागातील पेयजल प्रकल्प योजना लांबणीवर पडल्या आहेत. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक वेळ न घालवता लवकरात लवकर निविदा मागवून या कामांना सुरुवात करावी, तसेच प्रत्येक घरी नळ कनेक्शन पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर जिल्हयातील रुग्णालयांमध्ये बेडची आणि इतर वैद्यकीय सेवांची माहिती घेऊन, रुग्णांना योग्य वेळेत योग्य उपचार मिळणे, आणि विशेष करून बाळंतिणीसाठी सरकारी रुग्णालयात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, अशा पद्धतीने सेवा पुरवाव्यात याकरिता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
त्याचप्रमाणे अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निवारणासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना, बियाणे-खतांची उपलब्धता, रस्ते, शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारती, तसेच विविध पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय सुविधांबाबत माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना एल. के. अतिक यांनी केल्या.