सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा दिवस पाळण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यासोबतच हा काळा दिन पाळण्याविरोधात अनेक कन्नड कार्यकर्त्यांनी द्वेषापोटी प्रक्षोभक विधाने करण्यास सुरुवात केली आहे. १ नोव्हेंबर रोजी काळादिनासाठी परवानगी दिल्यास प्रशासनाच्या विरोधात बाईक रॅली काढू, असा इशारा कर्नाटक रक्षण वेदिकेचा उपाध्यक्ष एच. एस. सोमपूर याने केली आहे. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे.
आज पत्रकारांशी बोलताना करवेच्या उपाध्यक्षाने पिरनवाडीच्या संगोळी रायन्ना पुतळ्यापासून चन्नम्मा सर्कल पर्यंत प्रशासनाविरोधात बाईक रॅली काढण्याचा इशारा दिला असून महाराष्ट्र एकीकरण समितीला काळा दिन पाळण्यासाठी परवानगी देऊ नये, असे वक्तव्य केले आहे.
समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांच्यावतीने १ नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळण्यात येतो. सकाळी सायकल फेरी आणि मूक मोर्चाने सरकारच्या विरोधात निषेध नोंदविण्यात येतो. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट आहे. परंतु मराठी भाषिकांना कायम दुय्यम दर्जा देणाऱ्या प्रशासनाच्या निदर्शनास मराठी भाषिकांविरोधात प्रक्षोभक विधाने करणाऱ्या विरोधात कोणतेच पाऊल उचलण्यात येत नाही.
लोकशाहीवर भाषणे देणाऱ्या राजकारण्यांनीही हेतुपुरस्सर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. या लोकशाहीत सीमाभागातील मराठी माणूस येत नाही का? असा संतप्त सवाल मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहे.
कर्नाटकात ज्या ठिकाणी पोट निवडणूक सुरू आहे तिथं हजारोंच्या संख्येने प्रचारासाठी सभा होत आहेत हजारो कार्यकर्ते एकत्र होत आहेत मात्र कोविडचे निमित करुन त्यांना परवानगी नाकारली जात नाही.बेळगाव देखील या राज्याचा घटक असेल तर दोन्ही कडे समान न्याय असायला हवा अशी मत देखील व्यक्त होत आहे.