दसरा व दिवाळी सणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून कोल्हापूर ते तिरुपती खास उत्सव स्पेशल एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आली आहे. आज आज बुधवार दि. 28 ऑक्टोबरपासून येत्या दि. 18 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये ही रेल्वे दररोज धावणार असल्याचे नैऋत्य रेल्वेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सदर 07415 व 07416 या क्रमांकाची ही उत्सव स्पेशल रेल्वे हे तिरुपती -कोल्हापूर -तिरुपती या मार्गावर धावणार आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूर, मिरज, बेळगांव, खानापूर, लोंढा, हुबळी – धारवाड या परिसरातील बालाजी भक्तांना रेल्वेने प्रवास करून बालाजी दर्शन घेता येणार आहे.
या उत्सव स्पेशल रेल्वेचा आज रात्री 9 वाजता तिरुपती येथून त्याचप्रमाणे कोल्हापूर येथून येत्या शुक्रवार दि 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता शुभारंभ होणार आहे बुकिंग असणाऱ्या प्रवाशांना या रेल्वे मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आज रात्री तिरुपती येथून निघाल्यानंतर 19 तास 35 मिनिटात 22 थांबे घेऊन ही रेल्वे कोल्हापूरला पोहोचणार आहे.
तिरुपती येथून रात्री 9 वाजता निघणारी ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता बेळगांवला तर दुपारी 4:35 वाजता कोल्हापूरला पोहोचणार आहे. कोल्हापूर येथून सकाळी 11:30 वाजता निघालेली ही रेल्वे दुपारी 3:45 वाजता बेळगांवला तर दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजता तिरुपतीला पोहोचणार आहे.
सदर उत्सव स्पेशल रेल्वेला हातकणंगले, मिरज, कुडची, रायबाग, घटप्रभा, बेळगांव, खानापूर, लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी यासह इतर थांबे असणार आहेत. यापूर्वी हरिप्रिया एक्सप्रेस या नावाने धावणारी ही रेल्वे सध्या काही दिवसासाठी उत्सव स्पेशल रेल्वे म्हणून धावणार आहे दिवाळीच्या काळात तिरुपती बालाजीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे उपयुक्त ठरणार आहे