बेळगांव शहराच्या लोकसंख्येत आणि पर्यायाने विस्तारात झपाट्याने वाढ होत असून या अनुषंगाने मिळकतींच्या बाजार मूल्यांच्या दरात देखील विक्रमी वाढ झाली आहे. शहरांतर्गत महत्त्वाच्या गल्ल्या व बाजारपेठा यांच्या बाजार मूल्यात मागील वीसएक वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. वाढती मागणी बाजार पेठेचे असलेले महत्त्व आणि महत्त्वाच्या मार्गावर मालमत्ता असण्यासाठीच्या चढाओढीतून हे दर वाढले आहेत.
मुद्रांक व नोंदणी खात्याने शहरातील मिळकतींच्या सरकारी दराचा तक्ता बनवला आहे. या तक्त्यानुसार शहरातील मिळकतींच्या बाजार मूल्यांच्या बाबतीत खडेबाजार मार्ग हा सर्वाधिक महागड्या मिळकतींचा परिसर आहे. सध्या खडेबाजार मार्गावरील मिळकतींचा दर निवासी जागेसाठी 9,720 रुपये प्रति चौरस फूट तर व्यावसायिक जागेसाठी 13,608 रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. या आधी 22 वर्षांपूर्वी म्हणजे 1997 मध्ये खडेबाजार मार्गावरील मिळकतींचे बाजारमूल्य निवासी जागेसाठी 444.44 रुपये इतके तर व्यापारी जागेसाठी 888.88 रुपये इतके होते. यावरून येथील मालमत्तेच्या दरात किती वाढ झाली आहे हे लक्षात येते. कोरोना आणि पर्यायाने लॉक डाऊनमुळे अनेक क्षेत्रात मंदीची लाट आली परंतु खडेबाजार या प्रमुख बाजारपेठेच्या मार्गावरील जागेचा दर हा चढाच राहिला आहे.
खडेबाजार पाठोपाठ कॉलेज रोडवरील मिळकतींच्या सरकारी दरात देखील मोठी वाढ झाली आहे. 1997 च्या काळात या ठिकाणी असलेल्या निवासी मिळकतीचा दर 403.15 रुपये प्रति चौरस फूट इतका होता तो आता 7,200 रुपये प्रति चौरस फूट इतका झाला आहे. त्याचप्रमाणे व्यापारी मिळकतीचा दर पूर्वी 789.18 रुपये प्रति चौरस फूट इतका होता तो सध्या 2020 मध्ये 10,080 रुपये हे इतका झाला आहे.
शहरांतर्गत असलेल्या मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, हंस टॉकीज रोड, ध. संभाजी चौक परिसर, रविवार पेठेतील बाजारपेठ, समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी भागातील मिळकतींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सदर भागातील मिळकतींचे प्रति चौरस फूट अनुक्रमे निवासी व व्यापारी बाजार मूल्य पुढील प्रमाणे आहे. खडेबाजार : 9720 रु. -13,608 रु., किर्लोस्कर रोड : 8,556 -11,984, रामदेव गल्ली : 8350 -11,690, मारूती गल्ली : 8,250 -11,550, कडोलकर गल्ली 8,000 -11,200, टॉकीज रोड : 8,000 -11,200, रविवार पेठ : 7530 -10,542, ध. संभाजी चौक : 7580 -10,612, कॉलेज रोड :7,200 -10,080, समादेवी गल्ली : 5,760 -8,064, नरगुंदकर भावे चौक : 5,670 रु. -7938 रु.
एकंदर 1997 च्या दरम्यान शहरातील उपरोक्त भागात जागा अथवा जमीन खरेदी केलेल्यांच्या दृष्टीने सध्याचा काळ हा 20 पटीने नफा मिळवून देणारा ठरला आहे. विशेषता वारसाहक्काने जमीन प्राप्त झालेल्यांसाठी तर छप्पर फाडके लाभ मिळवून देणारा हा काळ असल्याचे रियल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.